◻️ दहावी पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार
संगमनेर LlVE (अकोले) | जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय किसान सभा, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) व डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले येथे ‘अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांचा इतिहास’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचा हा क्रांतिकारक वारसा विद्यार्थ्यांना माहित व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून विजेत्यांना प्रथम पारितोषिक ३००० रुपये, द्वितीय पारितोषिक २००० रुपये, तृतीय पारितोषिक १००० रुपये व प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये, तर द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये जाहीर करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेत दहावी इयत्तेपर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात.
सहभागी विद्यार्थ्यांनी घरीच स्वतःच्या अक्षरात निबंध लिहून शिक्षक किंवा पालकांमार्फत दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अरुणा हॉस्पिटल, रासने संकुल, महात्मा फुले चौक, अकोले, ता. अकोले जि. अहमदनगर येथे, सहभाग शुल्क प्रत्येकी १० रुपयांसह जमा करावयाचे आहेत. निबंध जमा करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. जमा झालेल्या निबंधांमधून तज्ञ परीक्षक, उत्तम अशा ५० निबंधांची निवड करतील.
निवड झालेले निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना अकोले येथे उपस्थित राहून प्रत्यक्ष निबंध लिहावा लागेल. अकोले येथे उपस्थित राहून प्रत्यक्ष लिहिलेल्या निबंधांतून वरीलप्रमाणे पाच पारितोषिकांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.
विद्यार्थ्यांची या विषयाची तयारी करून घेण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. सदरच्या विषयावरील बंडकरी, बागडीची माची, आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे अशी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बंडकरी या अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांवर डॉ. अजित नवले व गोपाळा धोंडू भांगरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या २००० प्रति तालुक्यात वितरीत करण्यात आल्या असून आणखी १००० प्रति उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
बंडकरी व विठ्ठल शेवाळे लिखित आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या पुस्तकांच्या पी.डी.एफ. सर्वत्र वितरीत करण्यात आल्या आहेत. अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी होत असलेल्या या उपक्रमामध्ये तालुक्यातील उपक्रमशील शिक्षण, मुख्याध्यापक व शाळांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
दरम्यान डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड, प्रकाश साबळे, राजाराम गंभिरे, एकनाथ सदगीर यांनी यामध्ये सहभाग नोदंवण्याचे आवाहन केले आहे.