संगमनेर LIVE | पाच नद्यांचा संगम असलेले संगमनेर शहर हे ऐतिहासिक व सांस्कृतिक आहे. शहराला साहित्य संपदेचा मोठा वारसा लाभला असून आकाश चिप्पा यांनी लिहिलेल्या मी आणि माझ्या गाव पुस्तकांने संगमनेरच्या साहित्य संपदेमध्ये भर टाकली असल्याचे गौरवगार विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काढले आहे.
व्यापारी असोसिएशन हॉल येथे ‘मी आणि माझा गाव’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर, प्रा. हिरालाल पगडाल, गणेश मादास, लेखक आकाश चिप्पा, प्रकाश कटारिया, सौ. अंकिता चिप्पा, राजेंद्र चिप्पा, अमोल चिप्पा, अरविंद गाडेकर, श्रीनिवास पगडाल, अनिल सोमणी, सुनील मादास यांचे सह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की, संगमनेरला साहित्य संस्कृतीचा मोठा वारसा असून ‘मी आणि माझा गाव’ या पुस्तकामुळे या परंपरेमध्ये भर पडली आहे. कवी आनंत फंदी पासून सुरू झालेली ये परंपरा जोपासताना अनेकांनी यामध्ये योगदान दिले आहे. या सर्व साहित्यिकांचा संगमनेर करांना अभिमान आहे. आगामी काळामध्ये प्रवरा नदीच्या सुशोभीकरणासह संगमनेरच्या समृद्ध इतिहास दर्शविणारे संग्रहालय बनवण्याचा मानस असून यामुळे अनेकांना त्यातून प्रेरणा मिळणार आहे. पदमशाली समाज हा निष्ठावान व प्रामाणिक असून या समाजातून अनेक प्रतिभावंत युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. माणूस गावाच्या बाहेर गेला की गाव आठवते. संगमनेर हे तर प्रत्येकाला सूकून देणारे शहर आहे. गावपणाची अनेक आठवणींना उजाळा देणारे हे पुस्तक असल्याचेही आमदार तांबे यांनी म्हटले आहे.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विकास कामांमधून मॉडेल शहर ठरले आहे. विकासाबरोबरच इथली हिरवाई ही सर्वांसाठी सुखद असून पाच नद्यांचा संगम असलेल्या संगमनेरचा प्रत्येकाला अभिमान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चिप्पा परिवाराने आपली प्रगती केली असून या नव्या पुस्तकामुळे तरुणांना पंधरा वर्षांपूर्वीचे गाव आठवणार आहे. आठवणींचा ठेवा हा जीवनात सर्वात अनमोल असून त्या सर्व लिखित स्वरूपात आणून एक नवा आदर्श तरुणांपुढे आकाश याने उभा केल्या असल्याचे त्या म्हणाल्या.
प्राचार्य हिरालाल पगडाल म्हणाले की, गरीब परिस्थितीवर मात करून पदमशाली समाज आज दिमाखात उभा आहे. या समाजातील अनेक युवकांनी विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले असून साहित्य संस्कृती जोपासण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
डॉ. संतोष खेडलेकर म्हणाले की, नवा आशय, नवा विषय घेऊन संगमनेरच्या भाषेमध्ये लिहिलेले हे पुस्तक प्रत्येकाला स्वतःचे जीवन वाटणारे असे असल्याचे म्हटले.
लेखक आकाश चिप्पा यांनी आपल्या मनोगतात गावापासून दूर गेल्यानंतर प्रत्येकाला गावाची ओढ कळत असून माती बद्दलची असणारे प्रेम हे स्फूर्ती देणारे असल्याचे म्हटले आहे. यावेळी गणेश मादास व प्रकाश कटारिया यांनीही शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी साक्षी चिप्पा यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर युवा आर्किटेक्चर खेडलेकर यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर मधील साहित्यप्रेमी, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.