◻️ ७ लाख ९० हजार रुपये किंमती मुद्देमाल ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर LIVE | पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोकॉ रणजीत जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, चापोहेकॉ अर्जुन बडे व अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
हे पथक दि. ३० सप्टेंबर रोजी नगर मनमाड रोडने श्रीरामपूरकडे जात असताना राहुरी फॅक्ट्ररी येथुन एक पिकअप वाहन भरधाव वेगाने राहुरीच्या दिशेने जाताना दिसले. पथकास सदर पिकअपचा संशय आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना संशयीत वाहना बाबत कळविले असता पोलीस निरीक्षक आहेर यांनी तात्काळ पिकअपचा पाठलाग करुन संशयीतांकडे चौकशी करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पथकाने संशयीत वाहनाचा पाठलाग करुन थांबविले असता केबिनमध्ये तीन व पाठीमागील ट्रॉलीचे हौदात दोन इसम बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) जैद सय्यद (वय - १९), २) उमर शेख (वय - २१), दोन्ही रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, ३) मुजम्मिल शेख (वय - २२), रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर, ४) नजीर सय्यद (वय - २४), रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी व ५) सोहेल पठाण (वय १९), रा. नांदुर रोड, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पिकअप वाहनाचे कागदपत्र व त्यामधील भंगार सामान याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले.
त्यामुळे त्याच्याकडे अधिक सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदर पिकअप संगमनेर येथुन चोरुन आणला असुन, वाहनातील भंगार सामान हे युनूस स्क्रॅप सेंटर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी येथुन चोरी केल्याची कबुली दिली.
पथकाने आरोपींनी दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता संगमनेर व राहुरी येथील २ गुन्हे उघडकिस आणले आहेत. तर आरोपी जैद मुस्ताक सय्यद हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यात चोरीचे २ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर व उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.