निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडण्यात येणार - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ना. विखे पाटील यांच्या सुचना

संगमनेर LIVE (लोणी) | निंळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रृटी दुरूस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ही काम पूर्ण होताच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन गांभीर्याने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी त्यांनी  झालेल्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घेतल्यानंतर उर्वरीत काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिले. काम पूर्ण होताच कालव्यातून पाणी सोडण्याचे  नियोजन निश्चित करण्यात आले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

निळवंडे कालव्यातून प्रथम चाचणीचा शुभारंभ ३१ मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालवा व त्यावरील शाखा कालव्यांच्या शेवट पर्यंत केवळ १२ दिवसांमध्येच सुमारे १२० कि.मी. लांबीत यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात जलसंपदा विभागाला यश आले होते.

प्रकल्पाचा डावा कालवा कि.मी. २ ते २८ हा अकोले तालुक्यातील निवळ, म्हाळादेवी मेहंदुरी व कळस या भागातून जातो. अकोले तालुक्यातील भाग प्रामुख्याने डोंगराळ असल्यामुळे काही लांबीत एका बाजूला डोंगर व  कठीण खडकातील खोदाई व दुसऱ्या बाजूला १४ - १५ मी. उंचीचे माती भराव काम करून कालव्याचे काम करण्यात आलेले असल्याने सदर ठिकाणी कालवा खोदकाम करताना कालव्याच्या तळातील खडकास तडे गेले, तसेच काही भागातील खडक सछिद्र व भेगा असलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे ,अकोले तालुक्यातील निळ, म्हाळादेवी, मेहदुरी व कळसच्या भागामध्ये कालवा तळातील खडकामधील सपामधून गळती होत असल्याचे प्रथम चाचणीच्या वेळी निदर्शनास आले होते. याच कारणामुळे शेतकऱ्यानी आंदोलन केले होते ही बाब प्राधान्याने विचारात घेण्यात आली आहे.

कालव्याची दुरूस्ती न करताच पाणी सोडल्यास व पुन्हा पाझर झाल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो याबाबत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यानी जलसंपदा विभागाला आधीच आंदोलनाचे इशारे देवून ठेवले असल्याची बाब लक्षात घेवून कठीण खडकाच्या भागामध्ये कालवा तळात आणखी खोदाई करून त्यात काळी माती भरणे. मोठ्या भरावाच्या ठिकाणी रिटेनिंग वॉल करणे अशा प्रकारच्या गळती प्रतिबंधक उपाय योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्याना मंत्री विखे यांनी दिल्या आहेत

अकोले तालुक्यात पावसामुळे काळी माती उपलब्ध होण्यास व काॅक्रीटचे काम शीघ्रगतीने करण्यास अडचण निर्माण होत असल्याने सदरील कामे लवकर पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्यानी दिली असल्याचे सांगतानाच पावसाने उघडीप दिल्यास उपरोक्त कामे पूर्ण करून, क्राॅस  रेग्युलेटर व रिटेनिंग वॉलचे काम सुरक्षित पातळी पर्यंत आणून आवश्यकता भासल्यास मोठी गळती असलेल्या भागात प्लास्टिक कागदाचा वापर करण्याच्या सूचनाही आधिकाऱ्यांना विखे पाटील यांनी दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !