◻️ भर पावसात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर
◻️ शाळकरी मुलाने आणली उद्धव ठाकरेंसाठी ठेचा-भाकरीची शिदोरी
संगमनेर LIVE (राहाता) | शिवसेनेचे (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करीत भर पावसात भिजत बांधावर जात शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या समजावून घेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचे काम केले.
यावेळी एका शाळकरी मुलाने उद्धव ठाकरेंना ठेचा-भाकरी असलेली शिदोरी दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलाची आस्थेने चौकशी करून हीच माझी आशीर्वादाची शिदोरी म्हणत मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा प्राथमिक व छोटा दौरा आहे. याला मी काही दौरा समजत नाही. असे कबुलीही उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मागील वर्षीची अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही तोच यंदा दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून त्यात दुबार पेरणी वाया गेली आहे. आता अतिवृष्टी, दुष्काळ आणी पिकविम्याची भरपाई सरकार का देत नाही असा सवाल उपस्थित करत हे सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कोपरगांव तालुक्यातील काकडी येथील दुष्काळग्रस्त भागात पहाणी दौरा केला. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लभडे, कोपरगांवचे तहसीलदार संदीप भोसले, काकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पुर्वाताई गुंजाळ, कानिफ गुंजाळ आदीसह काकडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उध्दव ठाकरे यांनी काकडी गावचे शेतकरी विलास सोनवणे यांच्या बांधावर जाऊन पाण्याअभावी जळालेल्या बाजरी आणी सोयाबीन पिकाची पहाणी केली. यावेळी विलास सोनवणे या शेतकऱ्यांने सांगितले की, पाऊस न पडल्याने हातातोंडाशी आलेले दुबार पेरणीचे पिक जळून गेली आहे. सदरच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून पिकविम्याची भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावर उध्दव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी शेतकऱ्याच्या बांधावर विचारपूस करायला आलो आहे. दुष्काळ आहे, दुबार पेरणी वाया गेली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसवणार आहे याची आम्हाला चिंता आहे. नियमीत कर्ज भरणाऱ्यांना त्यांचे प्रोत्साहन अनुदान काही जणांना मिळाले नाही मग चोवीस कोटी अनुदान वाटले कुणाला? असा सवाल उपस्थित केला आहे. मागील वर्षीची अतिवृष्टीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. तर चालू वर्षाचा दुष्काळ व विम्याची भरपाई केव्हा मिळणार. दुबार पेरणी वाया गेली आहे त्यामुळे शासन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कधी करणार. शासन आपल्या दारी आले होते ना? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
यावेळी वयोवृद्ध शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडताना हाताला काम नाही. शेतीला व प्यायला पाणी नाही, पाणी सुध्दा विकत घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. तुम्ही काहीतरी करा अशी आर्त विनंती केली.
उद्धव ठाकरे दुष्काळी पाहणी दौरा करण्याच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी रांजणगाव देशमुख येथील अकरा वर्षीय सहावीत शिकणाऱ्या कार्तिक नवनाथ वर्पे या शाळकरी मुलाने उद्धव ठाकरे यांना शिदोरी भेट दिली. या शिदोरी मध्ये त्याच्या आजीने चुलीवर बनवलेली बाजरीची भाकरी, ठेचा आणि लोणचे होते. रुमालात बांधलेली शिदोरी उद्धव ठाकरे यांनी आपुलकीने हातात घेत या रांजणगाव देशमुख येथील कार्तिक नवनाथ वर्पे यास तू मला शिदोरी आणली पण तू जेवण केलं का अशी विचारणा केली, आज शाळेत का गेला नाही असेही विचारणा केली.
मला तुम्हाला भेटायचे होते त्यामुळे मी आज शाळेत गेलो नाही असे त्यांनी त्यांना सांगितले. त्याने सकाळ पासून चुलते दत्तात्रेय वर्पे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी यायचा आग्रह करत होता. त्याने येण्यास परवानगी देताच माझ्याकडे त्यांना द्यायला काही नसल्याने आजीला भाकरी आणि ठेचा बनवायला लावला आणि तो ठाकरे यांना भेट दिला.