लय भारी ! शेतकऱ्यांची लेक जावई झाले झाले क्लासवन अधिकारी!

संगमनेर Live
0
◻️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पती पत्नी बनणार एकाच वेळी अधिकारी

◻️ दाढ खुर्द येथील लेक - जावयाचे सर्वत्र अभिनंदन व सत्कार सोहळे 


संगमनेर LlVE | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो तरुण-तरुणी तयारी करतात. राज्यातील अनेक जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर अनेक प्रेरणादायी घटना समोर येत असतात. 

अशी एक प्रेरणादायी घटना नुकतीच संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे समोर आली आहे. यामध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरात नाव लौकीक असलेले साहेबराव भांड यांचे लेक - जावई यानी नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादित करत क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे डॉ. अमोल देविदास आडभाई व डॉ. ज्ञानेश्वरी भांड - आडभाई या पती - पत्नी चे सर्वत्र अभिनंदन व सत्कार सोहळ्यातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीमध्ये आडभाई दाम्पत्याचे नाव एकाचवेळी झळकले असून डॉ. अमोल देविदास आडभाई व डॉ. ज्ञानेश्वरी साहेबराव भांड (लग्नापूर्वीचे नाव) अशी या उत्तीर्ण यशस्वी झालेल्या अधिकारी पती-पत्नीची नावे आहेत. या दोघांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग सेवा परीक्षेत वर्ग १ पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे डॉ. ज्ञानेश्वरी या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिलांमध्ये राज्यात दहाव्या तर नगर जिल्ह्यात पहिल्या आल्या आहेत.

डॉ. अमोल आणि ज्ञानेश्वरी हे दोघे फेब्रुवारी २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले. डॉ. ज्ञानेश्वरी हिचे माहेर संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द हे आहे तर सासर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा हे आहे. घर सांभाळून दोघांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ यामुळे त्यांच्या यशाची वाट सुकर झाल्याचे दोघांनी म्हटल्याची माहिती मुलीचे वडील साहेबराव भांड यांनी दिली 

डॉ. अमोल आडभाई यांनी जनता इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ (सातारा) येथून पशुवैद्यकीय शिक्षण तसेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल, हरयाणा येथून पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले.

डॉ. ज्ञानेश्वरी हिने जिल्हापरिषद प्राथमिक शाळा खळी, ता. संगमनेर येथून प्राथमिक तर सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालयातून माध्यमिक तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आश्वी खुर्द येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले आहे. याव्यतिरिक्त क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ (सातारा) येथून पशुवैद्यकीय शिक्षण पदवी देखिल प्राप्त केली आहे.

वर्ष २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉ. ज्ञानेश्वरी व डॉ. अमोल यांनी उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. लग्नानंतर डॉ. ज्ञानेश्वरी हिने पहिल्या तर डॉ. अमोल यांनी दुसऱ्या प्रयत्नात अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर यश मिळवले आहे. त्यामुळे या दोघांची लवकरच शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे. 

दरम्यान डॉ. ज्ञानेश्वरी व डॉ. अमोल यांनी एकाचवेळी मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरतून कौतुक होतं असून संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द पंचक्रोशीत ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या लेक - जावयाचे सत्कार सोहळे आयोजित केले जात आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !