◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचा ७४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
◻️ शिर्डी मतदार संघातील सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत साखरेचे ५ नोव्हेंबर पासून वाटप
◻️ गावोगावी सुरु असलेल्या मराठा आंदोलनास पाठींबा
संगमनेर LlVE (लोणी) | सभासदांना उच्चाकी भाव देतानाच सर्वसामान्य जनतेला दिवाळी निमित्त मोफत पाच किलो साखर देऊन सर्वाची दिवाळी ही गोड करणार असल्याची माहीती खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७४ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी खा. डॉ. विखे पाटील बोलत होते. जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदुशेठ राठी, प्रवरा भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा गिताताई थेटे, जेष्ठ संचालक शांतीनाथ आहेर, राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे, उपाध्यक्ष सतीषराव ससाणे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छींद्र थेटे, कार्यकारी संचालक अमोल पाटील सर्व संचालक सभासद आणि कामगार उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात खा. विखे पाटील म्हणाले मागणी न करता सर्वाना न्याय देण्याची भूमिका ही आपली राहीली आहे. उच्चाकी भाव मागील वर्षी दिला यावर्षीचा भाव तीन हजार रुपये प्रतिटन अगोदरच जाहीर केला आहे. राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे केवळ आपल्या आशिर्वादाने आदर्श काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा आपल्यामुळेचं यशस्वी झाल्याबद्दल सर्वाचे आभार मानतानाच आज विरोधक टिका करतात पण सध्या मराठा आरक्षरणांसाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळावे ही मागणी आपली देखील असून यासाठी विखे पाटील परिवार जनते सोबत असल्याचे स्पष्ट करून विरोधकांचा योग्यवेळी त्यांच्या मैदानात उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रवरा शैक्षणिक संकुलाने तालुक्यातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना कोविड संकट लक्षात घेवून ५० टक्के फी सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यातील एकमेव नेते ठरले असल्याकडे लक्ष वेधून टिका करा पण टिका करतांना आपण काय केले हे पण जनतेला सांगा असा टोलाही त्यांनी लगवला.
दिवाळीसाठी शिर्डी मतदार संघातील सर्व रेशनकार्ड धारकांना पाच किलो साखर मोफत सेवा देऊन त्यांची दिवाळी गोड करणार असून त्याचे वितरण ५ नोव्हेंबर पासून होणार असल्याचे सांगितले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या साखर धोरणामुळे साखर उद्योगास बळ मिळत आहे. यावर्षी उसाचे संकटे आहे. पावसामुळे उस क्षेत्र घटत असले तरी उस लागवडीसाठी सभासदांनी प्राधान्य द्यावे असे सांगून हा गळीत हंगाम यशस्वी करा असे म्हस्के पाटील म्हणाले.
डॉ. भास्करराव खर्डे यांनी प्रवरा, मुळा आणि गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीला जाणारे पाणी थांबावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहीती देतानाच माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समाचार घेत आम्ही कोर्टात गेलो, न्यायालयीन लढाई करतो पाणी जावू नये प्रयत्न करतो पण यासाठी आपले योगदान काय? आपण यासाठी कधी मुंबईला गेला का ? केवळ विखे पाटील यांच्यावर टिका करून जनतेची दिशाभुल करू नका सांगितले.
दरम्यान प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष सतीषराव ससाणे यांनी आभार मानले.
मराठा आरक्षणा बाबत विखे पाटील परिवार कायमच्या सोबत आहे. आरक्षण मिळावे ही आपली मागणी आहे. यामुळे आजचा कार्यक्रमही सत्कार विना करण्यात आला. केवळ चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. गावोगावी सुरु असलेल्या आंदोलनास पाठींबा असल्याचे देखिल खा. डाॅ. विखे पाटील यांनी जाहीर केले.