संगमनेर LlVE | कोणताही स्वार्थ न ठेवता सदैव आपल्या सामाजिक कामातून इतरांना नेहमी प्रेरणा देणारे मुकेश वाल्हेकर यांनी नुकतेच स्वयंप्रेरणेतून आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील घाणीच्या विळख्यात सापडलेले बस स्थानक झाडून स्वच्छ केले आहे.
समाजात नेहमी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काही लोक मिरवत असतात. फोटो काढून तो समाजमाध्यमात टाकून आम्ही कसे समाजकार्य करतो हे दिखाऊ समाज सेवक करत असतात. परंतु खरोखर ज्या वेळी समाजाला श्रमदान व मदतीची गरज असते त्यावेळी मात्र हे लोक गायब असतात. याउलट कोणतेही सामाजिक काम असो मुकेश वाल्हेकर मात्र स्वतः श्रमदान करत असतात. आश्वी खुर्द येथील बस स्थानक व परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचल्याचे पाहून मुकेश वाल्हेकर यांनी हातात झाडू घेत बस स्थानक पुर्णपणे स्वच्छ केल्यामुळे परिसर चकाचक दिसत होता.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी समाजमाध्यमात मुकेश वाल्हेकर यांचा स्वच्छता अभियानाचा विडीओ वायरल केल्यानंतर नागरीकानी वाल्हेकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
कोण आहेत वाल्हेकर..
मुकेश वाल्हेकर हे सामाजिक व धार्मिक कार्यात वाहून घेतलेले आश्वी खुर्द येथील तरुण व्यक्तीमत्व आहे. खासदार राहुल गांधी यांचे ते मोठे चाहते असून महाराष्ट्रातून ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान पायी चालत असताना पत्रकाराने घेतलेल्या त्याच्या मुलाखतीचा विडीओ तुफान वायरल झाला होता. जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळाबरोबरचं ठिकठिकाणी होत असलेल्या सप्ताहात श्रमदान ते करत असतात.
मी स्वयंप्रेरणेतून बसस्थानक व परिसर स्वच्छ केला असून, यापुढील काळात याच प्रकारे गावातील अस्वच्छ असलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. आठवड्यातून किमान एक दिवस दोन तास स्वच्छता अभियान राबवणार आहे. या स्वच्छता अभियानात नागरीकानी सहभागी होऊन आपला परिसर व गाव स्वच्छ करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन मुकेश वाल्हेकर यांनी केले आहे.