वरंवडी येथिल माणिकगिरी महाराज अखंड हरिनाम नारळी सप्ताहास प्रारंभ
◻️ टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमला!
◻️ उपस्थित भाविकांसाठी पुरण - पोळीचा महाप्रसाद
संगमनेर LIVE | ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरत्या १५ व्या नारळी सप्ताहाची सुरुवात वरंवडी (ता. संगमनेर) येथे झाली असून यावेळी टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजरात हभप दत्तगिरी महाराज यांची गावातून भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.
यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या सप्ताहासाठी गावातील नागरिक व परिसरातील भाविक भक्त गेल्या महिनाभरापासून या सप्ताहासाठी प्रयत्न करत आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. गावातील भाविकांनी भोजनासाठी पुरण - पोळीच्या महाप्रसादाची व्यवस्था केली होती. या सप्ताहासाठी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या. तसेच प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह सहभागी होत या मिरवणुकीची शोभा वाढवली. याप्रसंगी रथातून काढण्यात आलेल्या दत्तगिरी महाराजांच्या रथावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. गावातील रस्त्यावरती विविध प्रकारच्या रांगोळ्या यावेळेस काढण्यात आल्या होत्या.
अतिशय उत्साहाच्या वातावरणात या सप्ताहाला सुरुवात झाली असून सप्ताहच्या ठिकाणी विविध रंगांची रोषणाई करण्यात आली. तसेच मंदिरावर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मोठा मंडप उभारण्यात आला असुन भोजनासाठी भजनी मंडळींसाठी स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान सप्ताहच्या पहिल्याच दिवशी मठाचे मठाधिपती दत्तगिरी महाराज यांनी यावेळी गावातील गावकऱ्यांचे व तरुणांचे आभार मानले व येणाऱ्या पुढील दिवसात असेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाची शोभा वाढवावी असे आवाहन यावेळी दत्तगिरी महाराजांनी केले.