वरवंडी येथे सुरू असलेल्या फिरत्या नारळी सप्ताहास महंत रामगिरी महाराजांची भेट
◻️ हा सप्ताह अखंडपणे दत्तगिरी महाराजांच्या आधिपत्याखाली सुरु राहावा - रामगिरी महाराज
संगमनेर LIVE | सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी नुकतीचं पठार भागातील वरवंडी (ता. संगमनेर) येथे सुरू झालेल्या फिरत्या नारळी सप्ताहास भेट दिली. त्यामुळे सप्ताहासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांमध्ये चैतन्याचे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रसंगी प्रवचनात बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, हा सप्ताह यापुढेही असाच अखंडपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने व दत्तगिरी महाराजांच्या आधिपत्याखाली चालू राहावा. आजच्या वरवंडीतील ह्या सप्ताहाचा प्रारंभ अत्यंत भव्य व खूप चांगला झाला आहे. या सप्ताहसाठी गावातील प्रत्येक माणूस तन्मयतेने सहभागी झाला आहे.
यावेळी चांगल्या प्रतीची व्यवस्था गावकऱ्यांकडून झाल्याने त्यांनी गावकऱ्यांचे कौतुक करुन ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज यांचे वरवंडी या गावावर अतिशय प्रेम असल्याचे सांगून त्यांची समाधी इथे असल्यामुळे वरवंडी पंचक्रोशीत या फिरत्या नारळी सप्ताहास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय याचा आम्हाला अत्यानंद होत आहे. मठाधिपती दत्तगिरी महाराजांच्या मार्गदर्शानाखाली गावातील तरुणांनी व महिलांनी या सप्ताहासाठी खूप मेहनत घेऊन चांगली तयारी केली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान यावेळी महंत दत्तगिरी महाराज यांच्यासह सप्ताह कमिटी, ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.