◻️ काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
◻️ नागपूर हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर
संगमनेर LIVE (नागपूर) | शिर्डी येथील महंत काशीकानंद महाराज यांच्या साई पालखी दिंडीला नाशिक पुणे महामार्गावर अपघात झाला होता, या अपघातात मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नागपूर अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला निघालेल्या शिर्डी येथील वारकऱ्यांच्या दिंडीत ३ डिसेंबर रोजी नाशिक पुणे महामार्गावर भरधाव कंटेनर घुसल्याने अपघात झाला. यामध्ये चार वारकरी मृत्युमुखी पडले तर दहाहून अधिक वारकरी जखमी झाले. मी स्वतः त्या कुटुंबीयांना भेटायला गेलो होतो, अत्यंत गरीब कुटुंबातील हे वारकरी आहेत, मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क केला मात्र अद्याप पर्यंत ती मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यावर मुख्यमंत्री सहायता कक्षातून ही मदत तातडीने वर्ग करावी आणि जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांची मागणी तात्काळ मान्य केली. एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेली घटना अत्यंत गंभीर आहे, दिंडीत कंटेनर घुसल्याने हा अपघात झाला. शासन अशा प्रसंगांमध्ये मदत करण्याची भूमिका घेतअसते, मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
थोरात पुढे म्हणाले, अपघात माझ्या मतदारसंघात झाला. मी स्वतः सर्व मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेलो होतो. शासनाने त्यांना आर्थिक मदत केली तर, त्यांच्या कुटुंबीयांना धीर राहील शासन त्यांच्यासोबत उभे आहे असे त्यांना वाटेल. या सर्वच वारकऱ्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सभागृहात उपस्थित आहेत, त्यांनी आजच या मागणीवर मदतीची घोषणा केली तर वारकरी बांधवांच्या कुटुंबीयांना आधार मिळेल.
दरम्यान बाळासाहेब थोरात यांची मागणी आणि मुख्यमंत्र्यांची घोषणा यामुळे वारकरी व त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी मदत व आर्थिक दिलासा मिळणार आहे.