अक्षता कलशांचे आश्वी पंचक्रोशीत जल्लोषात स्वागत
◻️ १३ गावांमध्ये कलश निमंत्रण देण्यासाठी तरुणाची मोटार सायकल रॅली
◻️ सोमवारी आश्वी येथे होणाऱ्या भव्य कलश मिरवणूकीला उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | श्री क्षेत्र आयोध्या येथे येत्या २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्रीरामलल्लांच्या शिल्पांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या महासोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलशांचे आश्वी (ता. संगमनेर) येथे शोभायात्रेच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो आश्वीकर उपस्थित होते.
अक्षता कलश हा आयोध्या मधून प्रत्येक राज्याच्या ठिकाणी आला असून त्यानंतर जिल्हा व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आलेला आहे. संगमनेर तालुक्यातून १० ते १५ ठिकाणी हा कलश पाठवण्यात आला असून यामध्ये आश्वीसह परिसरातील १३ गावांमध्ये हा कलश निमंत्रण देण्यासाठी नेला जाणार आहे. यावेळी ठिक-ठिकाणी स्थानिक नागरिक या कलशाच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आश्वी खुर्द येथील तरुणांनी मोटर सायकल रॅली काढून आश्वी बुद्रुक, उंबरी बाळापूर, प्रतापपूर, ओझर खुर्द, ओझर बुद्रक, शेडगाव, पिप्रीं लौकी अजमपूर, खळी, चणेगाव, झरेकाठी, दाढ खुर्द या १३ गावामध्ये निमंत्रण देण्यास सुरुवात केली असून सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी आश्वी येथे भव्य कलश मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.