दाढ बुद्रुक येथील तरुणाचा तर दाढ खुर्द येथील विवाहितेचा वेगवेगळ्या अपघात मृत्यू
◻️ गतीरोधक ठरतायत मृत्यूचे देवदूत?
◻️ दाढ बुद्रुक ते कोल्हार रस्त्यावर अपघाताची मालिका
संगमनेर LIVE | दाढ बुद्रक ते कोल्हार रस्त्यावर मागील दोन दिवसांत झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी अपघातात एक ३२ वर्षीय तरुणाने तर एक ३१ वर्षीय विवाहित महिलेने जीव गमावला आहे. या रस्त्यावर असलेल्या गतीरोधकामुळे एक अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याने हे गतीरोधक मृत्यूचे देवदूत आहेत का? हा प्रश्न या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना भेडसावत आहे.
संदीप भाऊसाहेब वाणी (वय - ३२, रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) हा तरुण जिओ केअर मध्ये नोकरी करत होता. सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी दाढ बुद्रुक - कोल्हार रस्त्याने रात्रीच्या सुमारास घराच्या दिशेने तो दुचाकीवरून येत होता. यावेळी दादा तांबे यांच्या वस्तीनजीक त्याला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने त्याचा भिषण अपघात झाला. यामध्ये या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत बुधवार दि. २० डिसेंबर रोजी सौ. स्वाती नितीन पाबळे (वय - ३१, रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) या आपल्या पती समवेत दाढ बुद्रुक ते कोल्हार रस्त्याने सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून राजुरीच्या दिशेने चालल्या होत्या. यावेळी खर्डे - पाटोळे वस्तीनजीक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील गतीरोधकावर दुचाकी आदळून अपघात झाला. यामध्ये सौ. स्वाती पाबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासु, सासरे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान या दोन्ही अपघातामुळे पुन्हा दाढ बुद्रुक ते कोल्हार रस्ता हा चर्चेत आला असून या रस्त्यावर असलेले गतीरोधक मृत्यूचे देवदूत ठरत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आता काय? उपाययोजना करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.