बालविवाह जागृती पद यात्रेत १ हजार मुलींनी घेतला सहभाग
◻️ कार्यक्रमासाठी जवळजवळ ३७०० विद्यार्थिनी उपस्थित
संगमनेर LIVE (शेवगाव) | बालविवाह जनजागृती अभियाना अंतर्गत तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील सर्व शिक्षक आणि मुली पदयात्रेत सहभागी झाले. रेसिडेन्सी हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक मार्ग, मुख्य बाजार पेठ, शिवाजी चौक, मोची गल्ली, पाथर्डी मार्ग, मिरी रोड असा यात्रेचा मार्ग होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या पुतळ्याला यात्रेत सहभागी असलेल्या इंग्लंडच्या स्वयंसेविका व सायकल यात्री जॉयस कॉनोली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यात्रेचा समारोप रेसिडेन्सी हायस्कूल येथे करण्यात आला.
शेवगाव शहरातील अनेक शाळांनी यामध्ये सहभाग घेतला. “बालविवाह कोन रोकेंगे, हम रोकेंगे हम रोकेंगे" आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ" अश्या घोषणांनी शेवगाव शहर दुमदुमले. यानंतर रेसिडेन्सी हायस्कूल येथे समारोपचा कार्यक्रमांमध्ये तहसीलदार प्रशांत सांगळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात अहमदनगर जिल्ह्यात स्नेहालयाने पुढाकार घेऊन उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे कौतुक केले. बाल विवाहा सारखी २१ व्या शतकामध्ये प्रथा अस्तित्वात नसण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे वचन त्यांनी या प्रसंगी सर्व उपस्थितांना दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संजय लड्डा यांनी केले.
स्नेहालय उडान प्रकल्प, जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर, जिल्हा न्यायालय अहमदनगर,अहमदनगर जिल्हा सायकल असोसिएशन, उचल फाउंडेशन, स्नेहप्रेम आणि अहमदनगर जिल्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सायकल यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.
बालविवाह जागृती सायकल यात्रा १६ ते २६ जानेवारी दरम्यान अनेक शाळा आणि गावांमधून बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्या विरुद्ध असलेलं कायदे याबद्दल जनजागृती करणार आहे. २६ जानेवारी २०२४ रोजी या सायकल यात्रेचा समारोप स्नेहालय एमआयडीसी अहमदनगर येथे होणार आहे.
प्रवीण कदम यांनी अहमदनगर जिल्ह्यात बालविवाहाची प्रमाण असून शेवगाव मध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची कारणे नमूद केली. बालविवाहा मुळे बालकांच्या आरोग्यावर आणि भविष्यावर होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली. उडान प्रकल्पाची ध्येय आणि उदिष्ट त्यांनी सांगितले. बालविवाह प्रतिबंधक कायदे,बाल विवाह पीडित मुलीचे पुनर्वसन त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे यासाठी उडान प्रकल्प करत असलेले काम याबद्दल सविस्तर सांगितले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष माधवराव देशमुख, सायकल यात्रेचे प्रमुख सल्लागार नितीन थाडे, स्नेहालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. जयाताई जोगदंड, विश्वस्त राजू कुमार, डॉ. मनीषा लढ्ढा, स्नेहालयाचे संचालक जाईस, त्याच्या बरोबर परदेशी पाहुणे लॉरेन्स व फेबी, राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संचालिका नंदा पांडूळे, विकास सुतार, फारुक बेग, स्वाती ढवळे, उडान प्रकल्पाचे शशिकांत शिंदे, पूजा झिने, यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
दरम्यान या कार्यक्रमासाठी जवळजवळ ३७०० विद्यार्थिनी, शिक्षक, पालक आणि गावातील लोक उपस्थित होते. स्नेहालयाच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह विरोधी पथनाट्य “शुभ मंगल सावधान" सादर केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य संपत दसपुते, उपमुख्याध्यापिका सौ. पुष्पलता गरुड, सचिन खेडकर, सुजाता खेडकर आणि शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.