क्षणार्धात होत्याचं झालं नव्हतं ; डिजेने दोघाना चिरडले!

संगमनेर Live
0
क्षणार्धात होत्याचं झालं नव्हतं ; डिजेने दोघाना चिरडले!

◻️ धांदरफळ येथील घटना ; एकाची प्रकृती गंभीर तर सहा जखमी

◻️ धांदरफळ बुद्रूक व खुर्दसह लग्न असलेल्या रणखांब गावावर शोककळा


संगमनेर LIVE | नवरदेवाला वाटे लावण्यासाठी आलेल्या मित्रमंडळी व नातेवाईकांच्या ध्यानीमनी नसताना माऊली डीजेच्या वाहनाच्या रुपाने धावून आलेल्या काळाने एका ३५ वर्षाच्या युवकाचा जागेवर बळी घेतला. तर उपचार सुरु असताना एका ६५ वर्षीय वृध्दाची प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना गुरुवार (दि. ४ जानेवारी) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ येथे घडल्याने, गावावर शोककळा पसरल्याची माहिती मिळाली.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, धांदरफळ येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवार (दि. ५ जानेवारी) रोजी तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथे लग्न ठरले होते. उद्याच्या लग्नासाठी नवरदेवाची परंपरेप्रमाणे गावातून वरातीने वाजत गाजत पाठवणी सुरु होती. त्यासाठी आणलेल्या डीजे (एमएच १६ एई. २०९७) समोर मित्रमंडळी, नातेवाईक व भाऊबंद नाचून आनंद व्यक्त करीत होते.

दरम्यान वाहन चालकांमध्ये अदली बदली झाली. नव्याने चालक म्हणून बसलेल्या व्यक्तीचा पाय उताराला असलेल्या वाहनाच्या ब्रेक ऐवजी क्लचवर पडल्याने नियंत्रण सुटलेले वाहन थेट समोरच्या जमावात घुसले. क्षणार्धात झालेल्या या घटनेत बाळासाहेब हरीभाऊ खताळ (वय - ३५) याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचां जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना त्याची पत्नी सोनाली हिने समक्ष पाहिल्याने तिला जोरदार मानसिक धक्का बसून ती जागेवरच बेशुद्ध झाली. या वाहनाने चिरडल्याने भास्कर राघु खताळ (वय - ६५) गंभीर जखमी झाले. 

त्यांच्यावर संगमनेर येथील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तसेच या दुर्दैवी घटनेत रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ, अभिजीत संतोष ठोबरे (वय - २२) व अलका खताळ हे सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर धांदरफळ बुद्रूक व खुर्दसह लग्न असलेल्या रणखांब गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे घटनास्थळी दाखल झाले. तर संगमनेरातील जखमी दाखल असलेल्या रुग्णालायांसमोर जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असल्याची माहिती मिळाली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !