संपाच्या पार्श्वभूमीवर राजूर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा!

संगमनेर Live
0
संपाच्या पार्श्वभूमीवर राजूर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा!

◻️अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा व किमान २६ हजार रुपये मानधन द्या!

संगमनेर LIVE (अकोले) | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज अकोले तालुक्यातील राजूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी महिलानी राजूर शहरांमध्ये शक्ती प्रदर्शन करीत भव्य मोर्चा काढला होता.

संपाच्या ४४ व्या दिवशी सिटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आदिवासी भागातील अंगणवाडीतील कर्मचारी व मदतनीस मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. हातात लालबावटे घेऊन अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या मोर्चाने राजूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत. कामावर हजर न झाल्यास आपणास कार्यमुक्त करण्यात येईल असेही नोटीसीमध्ये बजावण्यात आले आहे. नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्याची मोहीम सध्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू आहे. प्राप्त झालेल्या नोटिसा कार्यालयाच्या समोर जाऊन यावेळी फाडून हवेत भिरकावून देण्यात आल्या व बजावण्यात आलेल्या नोटिसींना कायदेशीर उत्तर तयार करून राजुर विभागाच्या सी.डी.पी.ओ. कार्यालयात जमा करण्यात आले. 

मानधन नको वेतन हवे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम  सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळाला पाहिजे, अंगणवाडी ताईना किमान २६ हजार रुपये मानधन सुरू झाले पाहिजे, सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अंगणवाडी ताईंना दिल्या पाहिजेत, यासारख्या प्रमुख मागण्या घेऊन काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश ताजणे, अध्यक्षा रंजना प-हाड, सचिव आशा घोलप, राजुर विभागाच्या प्रमुख निर्मला मांगे, नंदा म्हसे, मथुरा चौधरी, कविता औटी, पदमाताई पाटोळे, वंदना कराळे, लिलाबाई गायकर, द्रौपदा रावते, इंदुमती चोखंडे, मुक्ता शिंदे, छाया मोरे, माधुरी झोडगे, माधुरी वाकचौरे आदींनी केले. 

दरम्यान या मोर्चाला किसान सभेचे डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, शिवराम लहामटे, बहिरू रेंगडे, कॉ. घोडे, डीवायएफआय चे एकनाथ मेंगाळ, सिटूच्या संगीता साळवे,  श्रमिक मुक्तिदलाचे स्वप्निल धांडे, बिरसा ब्रिगेडचे दशरथ गभाले यांनी पाठिंबा दिला. राजुर विभागाच्या सी.डी.पी.ओ. सातळकर यांना यावेळी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मोर्चासाठी पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. 

राजूरला क्रांतिकारी लढ्याची मोठी परंपरा लाभली आहे. लाल बावट्याच्या नजीकच्या काळात पुन्हा सुरू झालेल्या आंदोलनांनी राजूर शहराची ही लढाऊ परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होत होताना दिसत आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !