वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास देणारा अर्थसंकल्प
◻️ भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया
संगमनेर LIVE (मुंबई) | वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास, असा हा अंतरीम अर्थसंकल्प आहे, 'जय अनुसंधान..!!' हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास देणारा आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
‘एक्स’ समाजमाध्यमावर त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आजवर या देशाने 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान' हा नारा प्रबळ केला ; मोदी सरकारचा यापुढचा नारा आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा,आकांक्षा आणि कल्याण हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आणि तोच आजच्या अर्थसंकल्पाचा गाभा आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी म्हटल्याप्रमाणे, मोदी सरकारचा जुलै महिन्यातील अर्थसंकल्प विकसित भारताचा नवा रोडमॅप घेऊन येईल.
सहाव्यांदा बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री मा निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करताना बावनकुळे यांनी बजेटमधील काही गोष्टी ठळकपणे गणल्या. नारीशक्ती, अन्नदाता शेतकरी, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वांगीण विकास साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प तसेच महिला सक्षमीकरण, महिलांना आर्थिक पाठबळ देणारा पायाभूत सुविधा मजबूत करणारा व युवकांना उद्यमशीलतेला - स्टार्टअप इनोवेशनला बळ देणारा 'रोजगारदाता' अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.