एकल महिलांना सर्वानी सन्मान द्यावा - सौ. कांचनताई थोरात
◻ संगमनेर खुर्द येथे २०० एकल महिलांचा सत्कार
संगमनेर LIVE | महिला भगिनींचा सन्मान करणे ही भारतीय संस्कृती आहे. दुर्दैवाने ज्या भगिनींवर एकल पणाचे दुःख आले आहे त्या सर्वांना आधार देत त्यांना सर्वांनी आदर व सन्मान द्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात यांनी केले असून यावेळी २०० एकल महिलांना आवळा व जांभूळ वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
स्व. नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर खुर्द मध्ये श्रीमती रोहिणी ताई गुंजाळ यांच्या पुढाकारातून एकल महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी श्रीमती रोहिणीताई गुंजाळ, सरपंच सौ. श्वेता मंडलीक, सौ. जयश्री शिंदे, सौ. रोहिणी कदम, सौ. स्वाती गोसावी, सौ. दिपाली गडगे, श्रीमती पवार यांसह सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी आत्मसन्मान मेळाव्यात ५०० महिलांना आवळा व जांबुळ वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. कांचनताई थोरात म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. हाच वारसा पुरोगामी महाराष्ट्र पुढे जपत असून एकल महिलांना सर्वांनी नेहमी सन्मान द्यावा.
दुर्दैवाने त्यांच्यावर एकल पणा आला आहे. अशावेळी त्यांना सर्व समारंभात सहभागी करून घ्या. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता मानवता जपा. वारकरी संप्रदायाने सर्वधर्मसमभाव व समतेचा मंत्र दिला आहे. पुरोगामी विचारांमध्येही अंधश्रद्धेला थारा नाही. हाच विचार संगमनेर तालुक्यात जोपासला जात असून नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्या वतीने महिला सबलीकरण्यासाठी सातत्याने आयोजित केले जाणारे उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्या म्हणाल्या
श्रीमती रोहिणी ताई गुंजाळ म्हणाल्या की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. कांचनताई थोरात व सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने महिला सबलीकरणाचे काम होत आहे. एकल महिलेला मोठे दुःख असून त्यांनी प्रत्येकाने आधार द्यावा. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्यावी. यासाठी जनजागृती म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली
यावेळी उपसरपंच गणेश शिंदे, सुभाष गुंजाळ, गुलाब शेख, रमेश सुपेकर, शिवाजी सातपुते, बाळकृष्ण गांडाळ, शुभांगी गुंजाळ, चंद्रकला गुरव, ज्योती मांडेकर, वैशाली मांडेकर, स्मिता गुंजाळ, मेधा अभंग यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी घोडेकर यांनी केले तर स्मिता गुंजाळ यांनी आभार मानले.