पंतप्रधान यांनी सुरु केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला मोठा आधार - सौ. शालिनीताई विखे
◻️ चिंचपूर येथे आश्वी गटातील १४ गावांमधील बांधकाम कामगाराना ३३४ संरक्षण पेटी आणि १५० गृहउपयोगी साहीत्याचे वितरण
संगमनेर LIVE (आश्वी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विविध योजना सुरु केल्या असून योजनांच्या माध्यमातून जनतेला मोठा आधार मिळाला आहे. योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र सरकारने सर्व समाज घटकांना लाभ होईल असा प्रयत्नही केला आहे. बांधकाम कामगारांसाठी योजना सुरु करुन, केंद्र सरकारने सामाजिक दायित्व निभावले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
चिंचपूर येथे आश्वी गटातील १४ गावांमधील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ३३४ संरक्षण पेटी आणि १५० गृहउपयोगी संचित साहीत्य वितरण कार्यक्रमात सौ.विखे पाटील बोलत होत्या. यावेळी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा सहकारी बॅकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, गिताराम तांबे, निवृत्ती सांगळे, भाऊसाहेब जऱ्हाड, बापूसाहेब गायकवाड, अशोकराव म्हसे, अजय ब्राम्हणे, गजाबा तांबे, विजयराव डेंगळे, संभाजी तांबे, सुदामराव वाणी, सहाय्यक कामगार आयुक्त एन. के. कवले, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या की, देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयोश्री योजना, बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु करुन, दूर्लक्षीत नागरीकांना मुख्य प्रवाहात आणले आहे. मोफत कोव्हीड लसीकरण, श्रीराम मंदिर उभारणी, काश्मिर प्रश्न, शेतकऱ्यांसाठी विमा सरंक्षण, पीएम किसान सन्मान निधी, याशिवाय महिला सक्षमीकरणाच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले जात आहेत.
शिर्डी मतदार संघात महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांबरोबरोच वैयक्तिक लाभार्थी योजनेतही मतदार संघ आघाडीवर असून, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करताना राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना घराघरात पोहोचविल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी गटविकास आधिकारी अनिल नागणे यांनी योजनांची माहीती दिली.
दरम्यान प्रास्ताविकामध्ये कैलास तांबे यांनी योजनेचा आढावाघेत परिसरात सुरु असलेल्या विकास कामांमुळेच सर्वसामान्य जनतेला याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी लक्ष्मण तांबे, यांनीही मनोगत व्यक्त केले.