पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे भूमीपूजन
संगमनेर LIVE (नंदुरबार) | नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे भूमीपूजन आज ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
शहरातील टोकरतलाव रोड येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेत सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यपाल रमेश बैस यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील, तर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय शिक्षण व आयुष चे आयुक्त राजीव निवतकर, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महमुनी, अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानांचेही भूमीपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.