शिबलापूर - पानोडी शिवेलगत बिबट्या जेरबंद!
◻️ मादी बिबट्या व तिचे दोन पिल्ले मोकाट ; दहशत कायम
संगमनेर LIVE (आश्वी) | मागील अनेक दिवसांपासून शिबलापूर - पानोडी शिवारात बिबट्ये धूमाकूळ घालत आहेत. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात एक वर्ष वयाचे आणि नर जातीचे बिबट्याचे पिल्लू जेरबंद झाले आहे. तर याचं परिसरात एक मादी बिबट्या व तिचे आणखी दोन पिल्ले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वनविभागाने संतर्कपुणे या मादी बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा मादी बिबट्या कडून धूमाकूळ घातला जाण्याची शक्यतेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
शिबलापूर हद्दीत व पानोडी शिवानजीक असलेल्या काळूबाई ओढ्याजवळ दत्तू काशीनाथ नांगरे यांची वस्ती आहे. मागील अनेक दिवसांपासून मादी बिबट्याचा तिच्या तीन पिल्लासमवेत याठिकाणी वावर वाढला होता. त्यामुळे दहशतीखाली असलेल्या नांगरे कुटुंबाने ही माहिती वनविभागाला कळवत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली.
त्यासाठी वेळोवेळी सरपंच प्रमोद बोंद्रे आणि प्रवीण खेडकर यांनी पिजंरा लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी याठिकाणी वनविभागाने पिजंरा लावून बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात एका बाजूला कुत्रा बांधून ठेवला होता.
मंगळवार पहाटे भक्ष्याच्या शोधात असलेले बिबट्याचे पिल्लू हे पिंजऱ्यात जेरबंद झाले आहे. त्यामुळे संतप्त मादी बिबट्या कडून परिसरात दहशत निर्माण केली जाण्याची भिती स्थानिकानी व्यक्त केली असून आणखी पिंजरे लावून मादी बिबट्यासह तीचे पिल्ले जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान नागरे वस्तीसह परिसरातील नागरिकांनी लहान मुलान सह स्वतः ची काळजी घ्यावी असे सांगून रात्री अपरात्री घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन वनाधिकारी सुहास उपासनी आणि हरिचंद्र जोजार यांनी केले आहे.