संविधान नव्हे तर काँग्रेस आणि इंडीया आघाडी धोक्यात - रामदास आठवले
◻️ रिपब्लिकन पक्षाचे आसाम येथे संविधान सन्मान सभेत शक्तिप्रदर्शन
◻️ देशभर रिपब्लिकन पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी ; नामदार रामदास आठवलेची ग्वाही
संगमनेर LIVE (गुवाहाटी) | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधानामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे. संविधानाला कुणाचाही धोका नाही. संविधान धोक्यात असल्याचा विरोधी प्रचार करणारे कॉग्रेस आणि इंडीया आघाडीच धोक्यात असल्याची खरमरीत टिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पक्षाकडून आसाम येथे बालापारा बॉगाईगाव येथे भव्य संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक करताना नामदार आठवले बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे आसाम प्रदेश अध्यक्ष उत्पल डेका, ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, निजामुद्दीन करीम, रुमी शर्मा, लुम्बिनी, कमल कलीता, कल्याण शर्मा, गुजरातचे रिपाइंचे प्रभारी जतीन भुट्टा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
नामदार आठवले पुढे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय देणारे आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही. संविधान बदलण्याचा खोटा प्रचार करून समाजात फूट पाडणे चूकीचे आहे. संविधान कुणाच्याही बापाला बदलता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर संविधान समर्थक आहेत. त्यांनी नवीन संसद भवन ला संविधान भवन नाव दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधकांनी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ते बदनाम होणार नाहीत. रिपब्लिकन पक्ष नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. ईशान्य भारतातील आसाम सोबत मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोराम मध्ये रिपब्लिकन पक्ष प्रबळ होत आहे. देशभर रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. देशभर रिपब्लिकन पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणार असल्याची ग्वाही नामदार आठवले यांनी दिली आहे.