खांबे गावातील पाझर तलावाच्या कामासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर
◻️ ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार लोखंडे यांच्याकडील पाठपुराव्याला यश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील खांबे येथे पाझर तलावाच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे या निधीची उपलब्धता झाली आहे. पाझर तलावाचे रुपांतर आता साठवण बंधाऱ्यात केले जाणार असल्याने खांबे आणि पंचक्रोशीतील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खांबे आणि पंचक्रोशितील गावांना गेली अनेक वर्षे पाण्याची गंभिर समस्या भेडसावत आहे. उन्हाळ्यातही या गावांना पाण्यासाठी टँकरची उपलब्धता करावी लागते. या गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून यासाठी ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पाणीप्रश्न कायमप्रश्नी सुटावा यासाठी मृद व जलसंधारणच्या अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
त्यानुसार मृद व जलसंधारण विभागाने गावातील असलेल्या बंधाऱ्याचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला मंत्रालयीन स्तरावर मंत्री विखे पाटील तसेच खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा झाल्यानंतर या साठवण तलावासाठी आता सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल खांबे येथील ग्रामस्थांनी मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिवराव लोखंडे यांचे आभार मानले आहे.