उद्योजकांना दिलासा देण्याचा निश्चित प्रयत्न करु - नामदार विखे पाटील
◻️ संगमनेर शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील आणि संस्था चालकांशी विखे पाटील यांनी साधला संवाद
◻️ केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरील सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही
संगमनेर LIVE | औद्योगिक वसाहतीच्या वीज प्रश्नाच्या संदर्भात वीज वितरण कंपनी आणि औद्योगिक विकास मंडळाच्या आधिकाऱ्यां समवेत स्वतंत्र बैठक घेवून उद्योजकांना दिलासा देण्याचा निश्चित प्रयत्न करु. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरील सर्व प्रश्नांच्या बाबतीतही पाठपुरावा करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
लोकसभा प्रवास योजनेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील आणि संस्था चालकांशी संवाद साधण्याकरीता प्रबुध्द संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार समिर ओराव, शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सरचिटणीस नितीन दिनकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.
या संमेलनास उपस्थित असलेल्या बहुतेक उद्योजकांनी केंद्र सरकारशी संबधित प्रश्न प्रश्नांबरोबरच केंद्र सरकारच्या लघु व सुक्ष्म उद्योग विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या समस्याही उपस्थित करण्यात आल्या. या प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडे निश्चित पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार ओराव यांनी दिले. मात्र विजेचा प्रश्न हा राज्याच्या अखत्यारीत असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी वीज वितरण कंपनीचे आधिकारी तसेच औद्योगिक विकास महामंडळाच्या आधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले. या वीजेच्या प्रश्नाबाबत एका उद्योजकाने देखील मागणी केली तर आवश्यक तेवढा वीजेचा दाब उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही वीज वितरण कंपनीची आहे. पण इतके वर्षे ही समस्या का सुटली नाही असा सवालही मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित केला.
महिला बचत गटांच्या सदस्या सौ. सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाष्य करताना खासदार ओराव म्हणाले की, बचत गटांचे कार्य हे खुप महत्वपूर्ण आहे. या माध्यमातून निश्चितच रोजगार निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बचत गटांचे उत्पादन फिक्की सहकार्याने आता विक्रीस कसे आणता येईल याचे प्रयत्न केंद्र सरकारने सुरु केले आहेत. प्रधानमंत्र्यांच्या व्होकल फॉर लोकल हा संदेश सुध्दा बचत गटांना अर्थलाभ करुन देत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या हर घर जल हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरु आहे. मात्र काही ठिकाणी या योजनेते झालेल्या भ्रष्ट्राचार झाल्याची तक्रार अतिशय गंभिर असून, याबाबत आपण संबधित विभागाशी संपर्क साधून निश्चित याचे गांभिर्य लक्षात आणून देवू असे आश्वासन खा. ओराव यांनी दिले. उद्योजक दिपक मनियार यांनी जीएसटी प्रमाणेच टिडीएससाठी सुध्दा सुलभ व्यवस्था निर्माण करण्याची मागणी या संमेलनात केली. याप्रसंगी शहरातील व्यापारी,उद्योजक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरअध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी केले.