‘जरांगेंचा बोलविता धनी कोण?’ देवेंद्र फडणवीसांनी सगळचं काढलं!
◻️ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ‘एसआयटी’ चौकशी
संगमनेर LIVE (मुंबई) | आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या म्हणजे मंगळवारी भाजप नेत्यांनी मराठा आंदोलनाचा विषय काढला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये याचा उल्लेख आज सभागृहात करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला जरांगे यांच्याशी काहीही देण घेणं नाहीये. मात्र त्यांच्या मागील बोलविता धनी कोण, याची माहिती बाहेर यायला हवी. ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, राजकारण आपल्या स्तरावर चालूच राहील. मात्र, आज समाजाला विघटन करण्याचं काम चालू आहे. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाचा पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितलं की, आम्हाला दगडफेक करा असं सांगितलं, असा खुलासा देखील यावेळी त्यांनी केला.
मराठा समाजाला मी आरक्षण दिलंय, ते आरक्षण हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही टिकवलं. यासोबतच सारथीसारखी संस्था देखील सुरू केली. मग, विद्यार्थ्यांना फी सवलत देणे, वसतीगृह मिळत नाही तोवर विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देणे असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना असेल या माझ्या काळात सुरू झाल्या. असे ही फडणवीस म्हणाले.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत या योजना आम्ही अजून यशस्वी केल्या. म्हणून मराठा समाजाच्या बाबतीत मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जे काही केलंय, ते मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे काही बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठिशी उभा आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे बोलताना फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना सवाल देखील केला. राज्यातील पोलिसांनी लाठीचार्ज का केला?, दगडफेक करायला कुणी सांगितलं?, याचं सर्वकाही कटकारस्थान समोर येतंय. जरांगे पाटील यांना रात्री घरातून बाहेर आणणारे कोण?, त्यांना भेटणारे कोण?, कुणासोबत बैठक झाली? पोलिसांवर दगडफेक करायला कुणी सांगितली तर आता यातील आरोपी सांगतायेत. पोलीस आपले नाहीत का, आपल्या पोलिसांना मारायचे?, असा प्रतिसवाल त्यांनी यावेळी केला.
दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही सहमती दर्शवत चौकशीचे आदेश दिले आहेत.