नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथून भाजपाच्या ‘गाव चलो अभियाना’ला सुरुवात

संगमनेर Live
0
नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथून भाजपाच्या ‘गाव चलो अभियाना’ला सुरुवात

 ◻️ देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंचा पहिला मुक्काम

◻️ ज्येष्ठांशी संवाद, शेतकरी - विद्यार्थ्यांशी भेटी ; कार्यकर्त्यांत संचारला नवा उत्साह

संगमनेर LIVE (नागपूर) | भाजपाच्या गाव चलो अभियानाची सुरुवात काटोल विधानसभा क्षेत्रातील पारडसिंगा येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुक्कामाने झाली. या मुक्कामात दोन्ही नेते एकूण १८ विविध कार्यक्रमात सहभागी होत असून ते भाजपा कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह संचारला आहे.

पारडसिंगा येथून भाजपाच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी प्रवासी कार्यकर्ता म्हणून भाजपाच्या महत्वाकांक्षी ‘गाव चलो अभियानात’ सहभाग नोंदविला. पारडसिंगा येथे कार्यकर्ता मेळाव्यातून गाव चलो अभियानाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे. देशातील जनतेला २०२९ पर्यंत अन्न सुरक्षेची गॅरंटी मोदीजींनी दिली असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलली आहे. बचत गट व सहकारी संस्थाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार परिणय फुके, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आशीष देशमुख, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, चरणसिंग ठाकूर, दिनेश ठाकरे, अरविंद गजभिये, राजीव पोतदार, वैशाली ठाकूर, संदीप सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत पारडसिंगा येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा, सुपर वॉरियर्स संवाद, बुथ प्रमुखांसोबत बैठक व चर्चा, बुथ समिती बैठक, बुथस्तरीय, बुथ कमेटी, पन्ना प्रमुखांसोबत चर्चा केली. यावेळी दोन्ही नेते दिवार लेखन कार्यक्रमात सहभागी झाले. पारडसिंगा येथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेतली. विचार परिवारातील कार्यकर्त्यांशी भेटी घेतल्या, युवक कार्यकर्ता बैठकीतून मार्गदर्शन केले, प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी व गावातील प्रभावी व्यक्तींशी भेटी घेतल्या. अनुसूचित जमातीच्या वस्तींना भेटी देत मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.

विकासाच्या राजमार्गाने शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार..

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर काटोल विधानसभा क्षेत्राच्या विकासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे काटोल ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग होत आहेच. याशिवाय कारंजा ते पांढुर्णा मार्गाचे बांधकाम झाल्यास हा राजमार्ग शेतकऱ्यांचे भविष्य बदलणारा ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते काटोल नगर परिषदेच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. 

ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला एक-एक निर्णय गरीब व मध्यमवर्गीयांच्या कल्याणाचा आहे. महाराष्ट्रात पट्टे वाटप कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्याच काळात झाली. झुडपी जंगलांचा निर्णय झाल्यास नागपूर जिल्ह्यात ९६ हजार गरिबांना पट्टे मिळू शकतात. नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही त्यांनी मानले.

१५ कोटी रुपयांचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर..

कुणबी सेवा संस्थाच्यावतीने जगदगुरू श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बावनकुळे यांनी काटोल-नरखेड तालुक्यातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. रोजगारक्षम पिढी तयार करायची असेल पुढील १५ वर्षांच्या विकास कारायचा असले तर स्किल डेव्लपमेंट सेंटर होणे आवश्यक आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !