आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महोत्सवाची मदत - पालकमंत्री
◻️ महासंस्कृती महोत्सव, कृषी व उमेद महिला बचतगट महोत्सवाचा थाटात शुभारंभ
संगमनेर LIVE (अहमदनगर) | वैविध्यपूर्ण अशा भारतीय संस्कृतीच्या धाग्याने आपला देश बांधला गेला आहे. राज्यालाही या सांस्कृतिक वारशाची मोठी परंपरा आहे. महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातुन आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी निश्चित मदत होईल, असा विश्वास राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हृयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शहरातील भिस्तबाग महल, सावेडी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महासंस्कृती महोत्सव’, कृषी व उमेद महिला बचतगट महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आपल्याकडे ६४ कला व १४ विद्या आहेत. या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्राने नवा आकार घेतला आहे. राज्याच्या संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन व्हावे यासाठीच शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव आयोजित करत जिल्ह्यातील कलाकांराना तसेच लोककलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.
अहमदनगर जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा आहे. तसेच साहित्यिक, कलाकार, नाट्यप्रेमींची मोठी संख्या आहे. जिल्ह्याच्या भूमीत साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांची परंपरासुद्धा उज्ज्वल आहे. लेखक, कवी, विचारवंतांनी आपापल्यापरिने साहित्याची उंची वाढविण्यासाठी मोठे यशस्वी प्रयत्न केले असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
आपल्या जिल्ह्याच्या आदिवासी क्षेत्रानेही निसर्गाबरोबरच संस्कृतीचा जपलेला वारसाही खुप मोठा आहे. जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीने निर्माण केलेली ओळख ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक तालुक्याचे असलेले खाद्य वैशिष्टय एकत्रित समजावे म्हणूनच या सांस्कृतिक महोत्सवाबरोबरच आयोजित केलेला हा खाद्य महोत्सव हा जिल्ह्याचे वेगळेपण निश्चित दाखवून देईल, असा विश्वासही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती तसेच ग्रामसेवकांचे अभिनंदन करत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे. गावातील गोरगरीबाला न्याय देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देऊन त्यांचे जीवनमान उंचावत गावचा सर्वांगिण विकास करण्यामध्ये ग्रामसेवकांची मोठी मोलाची भूमिका असते. गावामध्ये शासनाच्या योजना पारदर्शीपणे राबवुन गावाचा सर्वांगिण विकास करत शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत व्हावे, अशी अपेक्षाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, बचतगटांच्या माध्यमातुन महिलांचे एकत्रीकरण करत त्यांचा विकास साधण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आपला जिल्हा दुग्धोत्पादनामध्ये राज्यात अग्रेसर असुन दुध उत्पादक शेतकऱ्यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातुन पाच रुपयांचे अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगत पुरस्कारप्राप्त सर्व ग्रामपंचायती व ग्रामसेवकांचे त्यांनी अभिनंदनही केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आषिश येरेकर यांनी महोत्सव आयोजनामागची भूमिका विषद केली.
यावेळी आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव व आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरणही पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथेच्या पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीत तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महोत्सवाला नागरिकांची गर्दी..
महासंस्कृती, कृषी व उमेद महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या महोत्सवामध्ये मांडण्यात आलेल्या ऐतिहासिक वस्तुंचे, पर्यटनविषयक छायाचित्रांच्या प्रदर्शन पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. महोत्सवाच्या ठिकाणी कृषी विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल, तसेच बचतगटांनी उत्पादन केलेल्या वस्तुंच्या स्टॉललाही नागरिकांनी पंसती दर्शवली. बचतगटांच्या खाद्य स्टॉललाही नागरिकांनी भेट देत विविध पदार्थांचा आस्वाद घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.