प्रवरेच्या भुमीपुत्राने सहकार पंढरीत थाटली बहुराष्टीय कंपनी!
◻️ सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते लोणीत बहुराष्ट्रीय कंपनी कार्यालयाचे उद्घाटन
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आशुतोष छगनराव पुलाटे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पी. ९९ सॉप्ट डिजीटल या बहुराष्ट्रीय कंपनीची सुरूवात करून नवी संधी निर्माण केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोणी येथे बहुराष्ट्रीय कंपनी कार्यालय उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, गोवा - महाराष्ट्र बार असोसिएशनचे अँड. आर. बी. पुलाटे, प्रवरा बॅकेचे माजी संचालक छगणराव पुलाटे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. मंदाताई डुक्रे, पोलिस पाटील दिलीप पुलाटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागात सुरु झालेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीच्या शाखेतून ग्रामीण मुलाना रोजगार मिळण्याबरोबरचं प्रवरेचा माजी विद्यार्थी हा कर्मभुमीसाठी प्रयत्न करतो आहे, हा आनंद मोठा असल्याचे सौ. विखे यांनी सांगितले.
राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील प्रयोगशील शेतकरी आणि प्रवरा बॅकेचे माजी संचालक छगनराव पुलाटे यांचा आशुतोष हा मुलगा आहे. त्यांचे गावातील मराठी शाळा, प्रवरा माध्यामिक विद्यालय दुर्गापूर, विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, लोणी आणि प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी येथून संगणक अभियंता असा शैक्षणिक प्रवास केला.
नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करत आपल्या उणिवा शोधत पुणे ते अमेरिका हा नोकरीचा प्रवास करतांनाच पी. ९९ सॉप्टवेअर डिजीटल प्रा. ली. ही कंपनी सुरु केली. सध्या कंपनीच्या माध्यमातून विविध देशातील प्रोजेक्ट सुरु आहे. अमेरिका, हैद्राबाद बंगलोर, पुणे येथे कंपनीचे कार्यालय असून माझे गांव ही कमी नाही, ज्या परिसराने जगाला सहकारचा संदेश दिला तेथे कंपनीचे कार्यालय सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या कंपनीमध्ये ९० संगणक तज्ज्ञ कार्यरत आहे.
प्रवरा शैक्षणिक संकुलातून मिळालेले शिक्षण हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य युवकांना रोजगार देण्यासाठी हा उपक्रम असून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा शैक्षणिक संकुलात दिलेल्या सुविधामुळे या कंपनीमध्ये ग्रामीण विद्यार्थ्याना मोठी संधी उपलब्थ होत आहे, असे आशुतोष पुलाटे यांनी सांगिलते.