पुंजाआई महात्म्य ग्रंथ येणाऱ्या पिढ्यांना सकारात्मक उर्जा देईल - भास्करगिरी महाराज
◻️ आश्वी खुर्द येथील संत पुंजाआई मंदिराला महंत भास्करगिरी महाराज भेट देणार
संगमनेर LIVE (आश्वी) | पुंजाआई महात्म्य ग्रंथातून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. या ग्रंथाच्या माध्यमातून संत पुंजाआईने आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात केलेले कार्य नव्या पिढीला वाचनातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे संतांचे विचार आचरणात आणण्यासाठी संत पुंजाआई महात्म्य ग्रंथ हा सकारात्मक उर्जा स्त्रोत ठरणार असल्याचे गौरवोद्गार देवगड संस्थांनचे महंत भास्करगिरी महाराज यांनी काढले.
आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील ग्रामस्थांनी नुकतीच देवगड संस्थांनचे महंत महंत भास्करगिरी महाराज आणि प्रकाशनंदगिरीजी महाराज यांची भेट घेत त्याना ‘पुंजाआई महात्म्य ग्रंथ’ भेट दिला.
यामध्ये बकुपिपळगाव, प्रवरासंगम, पुनतगाव, पुणतांबे आणि आश्वी खुर्द येथे संत पुंजाआई यांनी अध्यात्माचा मार्ग सर्व सामान्य नागरिक व भक्त परिवार यांना कशा प्रकारे दाखवला तसेच त्यांच्या जीवनातील विशिष्ट प्रसंगाचे आणि विविध ठिकाणी असलेल्या मंदिराचे सचित्र रेखाटन या ग्रंथात करण्यात आले आहे. आश्वी बुद्रुक येथील कवी रामनाथ जऱ्हाड यांनी या सर्व ग्रंथाचे लेखन केले असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
दरम्यान या ग्रंथ निर्मितीत नचिकेत महाराज, बहिरट महाराज यांच्या उपलब्ध झालेल्या माहितीचा देखील समावेश केलेला आहे. याप्रसंगी संजय गायकवाड, जगदीश मुसमाडे, संतोष भडकवाड, कैलास गायकवाड, मनोज भंडारे आदि उपस्थित होते.
आश्वी खुर्द ग्रामस्थांनी संत पुंजाआई यांचा सुंदर असा ग्रंथ निर्माण केला असून आश्वी येथील मंदिर जिर्णोद्धाराचा मानस देखील बोलून दाखवला आहे. त्यामुळे लवकरचं आश्वी खुर्द येथील संत पुंजाआई यांच्या मंदिरास भेट देणार असल्याचे भास्करगिरी महाराज म्हणाले आहेत.