दूध उत्पादकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची जेष्ठ नेते शरद पवार यांची ग्वाही
◻️ दूध उत्पादकांच्या मागे ठामपणाने किसान सभा - डॉ. अशोक ढवळे
◻️ दूध आंदोलनाला खा. शरद पवार, खा. लंके, खा. वाकचौरे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांचा हात उंचावून पाठिंबा
संगमनेर LIVE (अकोले) | दुधाला ४० रुपये प्रति लिटर दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा भाग म्हणून अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी १४ दिवस शेतकरी बेमुदत धरणे आंदोलनावर बसले असून हे धरणे आंदोलन अद्यापही सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे अशी विनंती करणारे निवेदन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने व कोतुळ येथील सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जेष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात आले.
अकोले येथे अशोकराव भांगरे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी खासदार शरद पवार अकोल्यात आले होते. दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू अशी ग्वाही शरद पवार यांनी आंदोलकांना दिली.
यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडणी करत असताना दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत त्यांनी सखोल विश्लेषण केले. दूध प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनास कुणाचा पाठिंबा आहे, त्यांनी हात वर करावा असे आवाहन त्यांनी सभेस केले.
त्यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी हात उंचावून या आंदोलनास पाठिंबा दिला. मंचावर उपस्थित असलेले खासदार शरद पवार, खा. निलेश लंके, खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी व उपस्थित शेतकरी कार्यकर्त्यांनी आंदोलनास हात उंच करून पाठिंबा जाहीर केला.
कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी मेळाव्यानंतर किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी भेट दिली. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले हे यावेळी उपस्थित होते.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ व इतरांनी यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत व विशेषतः दूध उत्पादकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत किसान सभेने सक्रियपणे आंदोलनात उतरावे असे आवाहन केले.
किसान सभा आंदोलनाच्या पाठीमागे ठामपणे आहेच, शिवाय महाविकास आघाडीच्या सर्वच शीर्ष नेतृत्वाला व सत्तेत असणाऱ्या सर्व सत्ताधार्यांना भेटून दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत लक्ष घालण्याचे आवाहन आपण करणार असल्याचे डॉ. अशोक ढवळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान दि. २२ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दूध प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधणार असल्याचेही डॉ. अशोक ढवळे यांनी यावेळी जाहीर केले.