हिवरगाव पावसा येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात चिमुकली ठार
◻️ संगमनेर तालुक्यावर शोककळा ; वनविभागाच्या निष्काळजीपणाबाबत गावकऱ्यांची नाराजी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बुधवारी (१० जुलै) सायंकाळी बिबट्याने दिड वर्षाच्या चिमुकलीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दिड वर्षांच्या चिमुकली ओवी सचिन गडाख (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) हिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हिवरगाव पावसा गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिवरगाव पावसा गावात रोडच्या कडेला गडाख वस्ती आहे. मयत ओवीचे आई वडील हे शेतीसह दुध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी देखील त्याचे काम सुरू होते. चारा काढण्यासाठी आई मुलीला घेऊन घास कापण्यासाठी गेली होती.
आई गायीसाठी घास कापत होती. चिमुकली ओवी बांधावर खेळत होती. यावेळी झुडपात दडून बसलेल्या बिबट्याचा डोळा मात्र लहान चिमुकलीवर होता. त्यामुळे बिबट्याने चिमुकलीवर हल्ला करत तिला तोंडात धरून उचलुन गिनी गवतात नेले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील येणाऱ्या शिक्षकांनी पाहिला.
त्याचवेळी मुलीच्या आईने आरडा ओरडा सुरू केल्यामुळे तेथे एकच गर्दी जमली. लोकांनी गिनी गवताकडे धाव घेतल्याने बिबट्याने चिमुकलीला टाकून पलायन केले. उपस्थितानी तात्काळ चिमुकलीला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत चिमुकलीने आपला जीव गमावला होता.
दरम्यान झोळे व हिवरगाव पावसा येथे बिबट्यांचा वाढता वावर पाहता येथील ग्रामपंचायतीने वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी केली होती. परंतु आमच्याकडे पिंजरा शिल्लक नाही असे तोंडी सांगण्यात आले. आज हिवरगाव पावसा येथे वनाधिकारी यांनी वेळेत पिंजरा लावला असता तर चिमुकलीला जीव गमावावा लागला नसता. त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.