पांडुरंगा पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे, संकटे दूर कर - सौ. शालीनीताई विखे
◻️ चिंचपूर येथील श्री संत सुरदास महाराज आणि श्री कल्याणी महाराज श्री हरिहर अमृतेश्वर भैरवनाथ पायी दिंडीचे प्रस्थान
◻️ वारकऱ्यांना औषधे आणि रेनकोटचे वितरण
संगमनेर LIVE (आश्वी) | संतांचे विचार जपण्याचे काम वारीच्या माध्यमातून होत असते. विखे पाटील परिवार कायमच वारकऱ्यांसोबत राहिला असून पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आज सक्षमपणे पुढे सुरू आहे. असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सांगतानाच पांडुरंगा पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे आणि संकटे दूर कर अशी प्रार्थना सौ. विखे यांनी पांडुरंगा चरणी केली.
शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथील श्री संत सुरदास महाराज पायी दिंडी आणि पिंपरी निर्मळ येथील श्री कल्याणी महाराज श्री हरिहर अमृतेश्वर भैरवनाथ पायी दिंडी प्रस्थान प्रसंगी सौ. विखे बोलत होत्या.
पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे, प्रवरा बँकेचे संचालक गीताराम तांबे, दिंडी चालक नामदेव तांबे, ह. भ. प. मगनानंदगिरी महाराज, ह. भ. प. भाऊसाहेब महाराज ओळेकर, श्याम पवार, शिवाजी तांबे, एन. टी. निर्मळ, निर्मळ पिंपरीच्या सरपंच पुनम कांबळे, उप सरपंच महेश वाघे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी सौ. विखे म्हणाल्या की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वारीच्या माध्यमातून संतांची शिकवण दिली जाते आणि या माध्यमातून सक्षम पिढी ही उभे राहण्याचे काम होत आहे. शिर्डी मतदारसंघातून आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यासाठी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विखे पाटील परिवार हा नेहमीच त्यांच्यासाठी मदतीचा हात देत असतो.
वारीच्या माध्यमातून संतांचे विचार समाजाला एकत्र आणतात, समाजकारणाबरोबरच वारकऱ्यांचे आशीर्वाद हेच विखे पाटील परिवाराचे ध्येय आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी देखील कायमच वारकऱ्यांसाठी काम केलं आहे. याच माध्यमातून अनेक धार्मिक स्थळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आश्रमाची स्थापना करून या भाविकांना सेवा सुविधा देण्याचं काम केले आहे. वारीच्या माध्यमातून डोळस श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धेला बळी पडू नका हा संदेश देत असताना स्वतःची काळजी घ्या विखे पाटील परिवार आपल्या कायम सोबत आहे अशा शुभेच्छा ही त्यांनी वारकऱ्यांना दिल्या.
दरम्यान यावेळी विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून वारकऱ्यांना विविध औषधे आणि रेनकोटचेही वितरण करण्यात आले.