छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानकासमोर होणार
◻️ मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी, बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
◻️ शहीद स्मारक आणि १०० फुटी तिरंगा झेंडा उभारले जाणार
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली असल्याची माहिती विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीबाबत अधिक माहिती देताना आमदार तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेर मधील बस स्थानकासमोर व्हावा ही तमाम संगमनेरकरांची मागणी होती.
यानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने २०१८ एसटी महामंडळाकडे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा मिळावी याकरता प्रस्ताव देवून मागणी केली होती. याकरता नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी मोठा पाठपुरावाही केला. २०१९ नंतर सातत्याने आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला.
या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या जागा मागणीच्या प्रस्तावास व अश्वारूढ पुतळ्यासाठी अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोरच सुशोभीकरणासह भव्य असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार आहे.
त्याचबरोबर सध्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर मोठे शहीद स्मारक होणार असून या ठिकाणी १०० फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचे नियोजित असल्याचेही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जागेसाठी अंतिम मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाठपुरावा केल्याबद्दल विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा आमदार सत्यजित तांबे यांचे संगमनेरकरांनी अभिनंदन केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा होणार..
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्या असलेल्या पुतळ्या जवळ अद्यावत सुशोभीकरणासह भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारला जाणार असल्याचेही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे