कारखान्याची नवी वैभवशाली इमारत समृद्ध परंपरेचा माइलस्टोन - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
कारखान्याची नवी वैभवशाली इमारत समृद्ध परंपरेचा माइलस्टोन - बाळासाहेब थोरात

◻️ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या नवीन इमारतीचे पूजन

संगमनेर LIVE | सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आर्थिक शिस्त काटकसर आणि पारदर्शकता यामुळे कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून नवी इमारत ही या वैभवशाली परंपरेचा माईलस्टोन ठरेल असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत महत्त्वाचे स्थान ही एकनिष्ठतेमुळे मिळालेली मोठी संधी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या वास्तुशांती व पूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी सीडब्ल्यूसी वर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला याप्रसंगी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन संतोष हासे आदींसह उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई थोरात, बाबासाहेब ओहोळ व सौ. सविताताई ओहोळ आणि संतोष हासे व सौ. मनीषा हासे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, कारखाना स्थापन झाल्यापासून मातीच्या भिंतीत असलेल्या ऑफिसमध्ये कामकाज सुरू होते अत्यंत काटकसर व पारदर्शकतेतून कारखान्याचे कामकाज ही आपली परंपरा राहिली. त्यामुळे ऊस उत्पादकांना कायम उच्चांकी भाव मिळाला. नवीन कारखाना व  को जनरेशन प्लांट मुळे पुढील ५० वर्षाची व्यवस्था झाली असून अद्यावत ऑफिस असावे अशी सर्वांची व्यवस्था होती. ही नवी इमारत वैभवशाली परंपरेचा माइलस्टोन ठरेल.

देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीची भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. अच्युतराव पटवर्धनानंतर अहमदनगर जिल्ह्यातून या वर्किंग कमिटीत २०१८ पासून काम करण्याची संधी मिळाली. आता राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या १५ राष्ट्रीय नेत्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणे हे भाग्य आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेचे प्रेम, नेतृत्वाचा विश्वास, पक्षाशी एकनिष्ठता यामुळे मिळाले आहे.

सध्याचे राज्यात व देशात सुरू असलेले राजकारण हे अत्यंत चुकीचे आहे. अशा काळातही काँग्रेस पक्ष हिमतीने लढतो आहे. खा. राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाने सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे. आगामी काळ हा काँग्रेसचाच राहणार असून वडीलधाऱ्यांचे व परमेश्वराच्या आशीर्वादाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा उपयोग आपण कायम जनसामान्यांच्या विकासासाठी करत आहोत असेही ते म्हणाले.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, कारखान्याने अत्यंत अद्यावत व वैभवशाली इमारत उभारली आहे. शेतकरी सभासद ऊस उत्पादक आणि कामगार या सर्वांचे हित जपताना कायम उच्चांकी भाव दिला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे सामूहिक काम राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !