आदिवासी दिनी माकपचे आदिवासींच्या रोजीरोटीला चालना देणारे अभियान!
◻️ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा निर्णय
संगमनेर LIVE (अकोले) | जागतिक आदिवासी दिनानिमित्त व क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी क्रांतिकारकांना अभिवादन करत, आदिवासी कष्टकऱ्यांच्या रोजीरोटीला चालना देऊ शकेल अशा प्रकारचे अभियान राबवण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने घेतला आहे.
आदिवासी भागामध्ये बाळ हिरडा व हिरडा उत्पादन हे आदिवासी कष्टकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक मुख्य साधन आहे. बाळ हिरडा व हिरड्याला रास्त भाव मिळावा यासाठी किसान सभा गेले अनेक वर्ष संघर्ष करत आहे. मागील वर्षी या मागणीसाठी जुन्नर, आंबेगाव व अकोले या ठिकाणी जोरदार लढा किसान सभेच्या नेतृत्वाखाली देण्यात आला. नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे धरून राज्य सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले.
परिणामी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये हिरड्याला हमीभाव जाहीर झाला. या लढ्यामुळे काही प्रमाणात आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने पुढील पाऊल टाकत हिरडा हमीभावात वाढ करावी, हिरडा पिकांची सात बारावर नोंद व्हावी व हिरडा झाडांची मोठया प्रमाणात शेतात व वनांमध्ये लागवड व्हावी यासाठी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आदिवासी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर हिरड्याची झाडे मोठ्या प्रमाणात असतात मात्र त्याच्या नोंदी सातबारावर नसल्याने हिरड्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई आदिवासी शेतकऱ्यांना मिळत नाही. आंबेगाव व जुन्नर तालुक्यामध्ये किसान सभेने पुढाकार घेऊन ही झाडे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर नोंदवली, परिणामी २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळामध्ये झालेल्या हिरडा नुकसानीची भरपाई प्रदीर्घ लढा करून किसान सभेने आदिवासी शेतकऱ्यांना मिळवून दिली.
अकोले तालुक्यात सुद्धा मागील वर्षी हिरड्याच्या झाडांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या नावे व्हाव्यात यासाठी किसान सभेने मोहीम घेतली. अकोले तहसील कार्यालय व राजूर मधील मुख्य चौकात याबाबत बेमुदत धरणे धरण्यात आली. या सर्व आंदोलनाचा परिणाम म्हणून अकोले तालुक्यातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे हिरडा झाडाच्या नोंदी झाल्या आहेत.
मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात अशा नोंदी होणे बाकी आहे. या नोंदी सातबारावर व्हाव्यात यासाठी ९ ऑगस्ट पासून किसान सभेच्या वतीने तालुक्यात व्यापक अभियान राबवण्यात येणार आहे. हिरडा नोंदणीचे निशुल्क अर्ज किसान सभेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले असून किसान सभेचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरून घेऊन मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयामार्फत या नोंदी मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही करून घेणार आहेत.
९ ऑगस्ट दिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वसंत मार्केट येथील कार्यालयामध्ये सकाळी १०.३० वाजता अकोले, संगमनेर भागातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमतील, ९ ऑगस्ट दिनी व क्रांती दिन क्रांतिकारकांना अभिवादन करतील व महिनाभर चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात करतील.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. त्याच्या जोडीलाच आदिवासी समाजाच्या उत्पादनाची साधने सुरक्षित रहावी, आदिवासी कष्टकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, घटनेने दिलेल्या आरक्षणासह त्यांच्या सर्व अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी या अभियानात प्रयत्न केले जाणार आहेत.
वन विभागाने आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरड्याची झाडे लावावीत, नवीन हिरडा जातीचे संशोधन करून अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती कृषी विद्यापीठ व वन विभागाने विकसित कराव्यात, हिरड्याला रास्त बाजारपेठ मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करावेत व यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन मजबूत व्हावे यासाठी किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, वसंत वाघ, गणपत मधे, सोमा मधे आदि प्रयत्न करणार आहेत.