नारीशक्ती काय करू शकते हे बचत गट चळवळीने दाखवून दिले - सौ. विखे
◻️ खंडाळा येथे ‘भरारी महिला प्रभाग संघ’ आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
◻️ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | महायुती सरकारने विविध योजना महिलांसाठी सुरू करत महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण केले. नारीशक्ती काय करू शकते हे बचत गट चळवळीने दाखवून दिले आहे. बचत गटांतून टाकाऊ पासून टिकाऊ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना पूर्णताकडे जात असून याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. अनेक महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत दत्त नगर जिल्हापरिषद गटामध्ये खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथे ‘भरारी महिला प्रभाग संघ’ आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करतांना सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी श्रीरामपूर तालुका भाजपा निवडणूक प्रमुख नितीन दिनकर, भाजपा महिला तालुका अध्यक्षा मंजूषा ढोकचौळे, कल्याणी कानडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, विशाल गोरे, शिवाजी गोरे, चंद्रलेखा गायकवाड, महेश ढोकचौळे, अर्चना भागवत, ज्योती सबनीस यांच्या सह सर्व बचत गटातील महिला, सीआरपी, ग्राम संघ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे म्हणाल्या, महिलांनी अनुभवातून पुढे जाण्याची गरज आहे. महायुती शासनाने बचत गटाच्या चळवलीला प्रोत्साहन दिले आहे. महिलांसाठी आणि मुलींसाठी विविध योजनेतून त्यांना सक्षम केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, एसटी मध्ये ५० टक्के सवलत, प्रत्येक सरकारी कागदपत्रावर आईचे नाव टाकण्याचा निर्णय, आरोग्याच्या सुविधा, मुलींसाठी मोफत शिक्षण याबरोबरच शेती क्षेत्रातील महिलांसाठी विशेष योजनाही महायुती शासनाच्या माध्यमातून सुरू झाल्याचे सौ. विखे पाटील यांनी सांगतानाच नारीशक्तीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहभाग यामुळे वाढला असल्याचे सांगितले.
बचत गट चळवळ ही आता केवळ बचती पुरती मर्यादित राहिलेली नसून ग्राम संघाद्वारे त्याची व्याप्ती वाढली आहे. महिलांनी तयार केलेल्या उत्पादित मालाला बाजारपेठही उपलब्ध होऊन उलाढाल ही वाढली आहे. जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून चाळीस हजार महिलांनी विविध रोजगार सुरू केले आहेत. असे सांगून महिलांनी टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना राबवत नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण केले आहे. असे सौ. विखे पाटील यांनी सांगून संधी खूप आहेत ती शोधून पुढे जा. इतर महिला काय म्हणतील हा विचार न करता या संघाप्रमाणे भरारी घ्या असेही सौ. विखे यांनी सांगितले.
यावेळी नितीन दिनकर यांनी भरारी संघाच्या कार्याच्या कौतुक करतांना देशात आणि राज्यात महिलांचा सन्मान देण्याचं काम सुरू आहे विविध योजना तसेच महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील गावांना शेती महामंडळाच्या जमिनी घरकूलांसाठी मोफत दिल्याने पंधराशे महिलांचे घरांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. संघाच्या अध्यक्ष मंजुश्री ढोकचौळे यांनी भरारी ग्राम संघाचा आढावा घेतला. गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, चंद्रलेखा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा राणे यांनी तर आभार ज्योती सबनीस यांनी मानले.
महिलांनी एकमेकीला समजून घेण्याची गरज आहे. मुलांवर चांगले संस्कार करा. एकल महिलांना सन्मान द्या. उपवास करा पण त्या उपवासाच्या माध्यमातून अंधश्रद्धेला बळी पडू नका. लग्नातील मानपान बंद करा. आरोग्याची काळजी घ्या. एका विचाराने पुढे जा. हा संदेश देतानाच आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी करा आपली संस्कृती जपा असा संदेशही सौ. विखे पाटील यांनी दिला.