शासनाच्या योजना गरीबापर्यत पोहचवण्यासाठी कटीबद्ध - सरपंच सौ. गायकवाड
◻️ आश्वी खुर्द येथे २५ लाभार्थ्याना घरकूल मंजूरीचे पत्र प्रदान
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील २५ लाभार्थ्याना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठीची कागदपत्राची पूर्तता पुर्ण करण्यात आली असून या घरकूलाना शासनाची मंजूरी मिळाली असल्याचे पत्र नुकतेच लोकनियुक्त सरपंच सौ. अलका बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. गायकवाड म्हणाल्या की, गावातील जास्तीत जास्त गरजू नागरीकांनी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य ग्रामपंचायतीमार्फत केले जाईल. तसेच शासनाच्या इतर विविध योजना देखील गोर - गरीब जनतेपर्यत पोहचवण्यासाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे यांनी उपस्थित लाभार्थ्याना योजने बाबत तांत्रिक माहिती देताना सर्व लाभार्थ्याना लवकरात लवकर घराचे काम सुरू करण्याचे आवाहन केले. दरम्यान याप्रसंगी उपसरपंच बाबासाहेब भवर, ग्रामपंचायत सदस्य सोपान सोनवणे, संजय भोसले, सागर भडकवाड, विठ्ठल गायकवाड, सौ. कल्पना क्षिरसागर, सौ. जनाबाई शिंदे, सौ सुवर्णा सातपुते, सौ. आशा मुन्तोडे, सौ. संगीता बर्डे, गुलनाज सय्यद तसेच घरकुल योजनेतील सर्व पात्र लाभार्थी उपस्थित होते.