आश्वी येथील दोन व्यापाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून हाणामारी!
◻️ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल
◻️ एकीकडे मोबाईल लांबवला तर दुसरीकडे “आमच्या नांदी लागला तर एक एकाला संपवून टाकीन” दमबाजी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे भिंत पडल्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीतून आश्वी येथील दोन व्यापारी कुटुंबातील सदस्यांमध्ये शिविगाळ व हाणामारीची घटना घडली असून याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात कैलास लाहोटी व विलास भंडारी यांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कैलास लाहोटी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरूवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास लाहोटी हे दुकानसमोर उभे होते. यावेळी वैभव भंडारी, सनी भंडारी, रितेश भंडारी, यश भंडारी (सर्व रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) याठिकाणी आले व कैलास लाहोटी यांना म्हणाले की, तुमचा मुलगा दीपक याने आमच्या दुकानांची भिंत पाडली आहे.
त्यानंतर कैलास लाहोटी म्हणाले की, माझ्या मुलाने भिंत पाडलेली नसून तुम्ही गावकऱ्यासोबत याबाबत चर्चा करा, यामध्ये माझ्या मुलांचा काही संबंध नाही. असे म्हणाल्याचा राग आल्यामुळे त्यांना शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडणाचा आवाज ऐकून कैलास लाहोटी यांच्या पत्नी अनिता, मुलगी पुजा आणि राधीका यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील शिविगाळ करून मारहाण करण्यात आली.
यावेळी वैभव भंडारी यांने कैलास लाहोटी यांच्या खिशातून ९ हजार ९९९ रुपये किंमतीचा मोबाईल नेला असल्याचे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे गुन्हा रंजिस्टर नंबर १६३/२०२४ नुसार कलम ११५(२), ३५२, ११९(१) प्रमाणे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तर विलास भंडारी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास माझा पुतण्या सनी हा माझ्याकडे आला. यावेळी सनी म्हणाला की, मी आणि दीपक गप्पा मारत असताना दीपकचे वडील कैलास तेथे आले व म्हणाले की, तुमच्या किराणा दुकानांची भिंत पडली असून तुम्ही आता बरबाद होणार आहात. ‘असे म्हणू नका’ असे मी म्हणालो असता कैलास काका, राधा दिदी व पुजा दिदी यांनी मला शिविगाळ केली.
त्यामुळे मी, मुलगा वैभव, पुतण्या सनी, रितेश, यश यांनी लाहोटी यांना म्हणालो शिविगाळ करु नका आपण आपल्यात मिटवून घेऊ. असे म्हणताचं कैलास लाहोटी त्याची पत्नी व मुली या आमच्या अंगावर धावून आले. यानंतर त्यांनी आम्हाला शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचंवेळी हातात काठी घेऊन कैलास लाहोटी आमच्यावर धावून येत म्हणाला की, “तुम्ही आमच्या नांदी लागला तर एक एकाला संपवून टाकीन” असा दम दिला.
यावेळी झालेल्या भांडणात मुलगा वैभव याला दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे गुन्हा रंजिस्टर नंबर ३६९/२०२४ नुसार कलम ११५(२), ३५२, ३५१(३) प्रमाणे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.