मतदार संघाचा विकास अनुशेष भरून काढण्यावर भर देणार - खा. वाकचौरे

संगमनेर Live
0
मतदार संघाचा विकास अनुशेष भरून काढण्यावर भर देणार - खा. वाकचौरे

◻️ शिर्डी - अकोले - शहापूर रेल्वे मार्गासह सात कलमी विकास प्रस्ताव खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना सादर 

संगमनेर LIVE (अकोले) | अकोले विधानसभा मतदार संघाच्या खऱ्याखुऱ्या विकासाचा दृष्टीकोन असलेला सात कलमी विकास प्रस्ताव आज माकपच्या वतीने खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत तयार करण्यात आला. माकपच्या अकोले येथील पक्ष कार्यालयात विकास चिंतन सभेत विविध अंगांनी चर्चा करून हा प्रस्ताव बनविण्यात आला. अकोले तालुक्याच्या व संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या दृष्टीने आवश्यक निवडक मागण्या विचार मंथनातून निश्चित करत हा प्रस्ताव बनविण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत माकपने खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठींबा दिला होता. निवडून आल्यानंतर मतदार संघाचा  विकास अनुशेष भरून काढण्यासाठी माकपने आग्रह धरलेल्या विकास आराखडयावर  निर्णायक काम करू असे आश्वासन खा. वाकचौरे यांनी दिले होते. त्यानुसार आज पक्षाच्या कार्यालयात खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत हा प्रस्ताव बनविण्यात आला. 

माकपच्या वतीने यावेळी,  शिर्डी - अकोले - शहापूर रेल्वेमार्ग अस्तित्वात यावा. एन.डी.डी.बी. अंतर्गत अकोले येथे आधुनिक सरकारी किंवा सहकारी दुग्ध प्रक्रिया प्रकल्प सुरु करावा. आदिवासी भागात केंद्र सरकारच्या विकास योजनेचा भाग म्हणून सरकारी हिरडा प्रक्रिया प्रकल्प सुरु करावा. राजूर येथे जिल्हा रुग्णालय समकक्ष सरकारी हॉस्पिटल उभारावे. 

तोलार खिंड (गाढवा डोंगर) टनेल करून तालुक्याला माळशेजमार्गे मुंबई जवळ करावी. मुळा, प्रवरा, आढळा  खोऱ्याचे पाण्याचे पुनर्वाटप होऊन आदिवासी भागासह अकोले विधानसभा मतदार संघाला पाण्याचा रास्त वाटा मिळावा, डोंगरांवरून इतर जिल्ह्यांमध्ये वाहून जाणारे पाणी मतदार संघातील संपूर्ण भूभाग सिंचनासाठी वळवावे. 

अकोले तालुक्यात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होईपर्यंत मजुरांची परवड थांबावी यासाठी आळेफाटा येथे मोफत मुक्काम व अल्प दरात भोजन व्यवस्थेसह ‘सरकारी मजूर निवारा केंद्र’ उभारावे या सात मुद्यांच्या आधारे हा प्रस्ताव तयार करण्यात आला.

प्रस्तावातील मागण्या जनतेच्या खऱ्याखुऱ्या विकासाची पूर्व अट असून यावर अत्यंत प्राधान्याने काम सुरु करू असे आश्वासन यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले. आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार या ग्रामीण श्रमिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात आले. संसदेत या मागण्यांचा पाठपुरावा करू असे त्यांनी यावेळी सांगितले. 

वन जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची पिक पाहणी त्यांच्या नावावर लागावी यासाठी पिक पाहणीचे अर्ज पक्ष व किसान सभेच्या वतीने भरून घेण्यात आले. अकोले विधानसभा मतदार संघाचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभिरे, तुळशीराम कातोरे, ताराचंद विघे, संगीता साळवे, हेमलता शेळके, शिवराम लहामटे यांनी विकास प्रस्तावातील विविध मुद्दे सभागृहासमोर मांडले. सविस्तर चर्चे अंती ठरविण्यात आलेल्या या मुद्यांच्या पूर्ततेसाठी जोरदार प्रयत्न करण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !