राजकारणाची चांगली संस्कृती व परंपरा पुढे न्या - बाळासाहेब थोरात
◻️ पेमगिरीच्या किल्ल्यावरून युवा संवाद यात्रेचा प्रारंभ ; ५ हजार युवकांची उपस्थिती
◻️ १७१ गावातून १३ दिवसात ५०० किलोमीटरचा प्रवास
संगमनेर LIVE | स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शहागडावर विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजर, सूर आणि सांभाळाच्या साथीने भारावून टाकणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांबरोबर तालुक्यातील १७१ गावांमधील तरुणांशी संवाद साधण्याकरता डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील चांगल्या राजकारणाची संस्कृती पुढे घेऊन जा अशा शुभेच्छा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.
पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद यात्रेचा प्रारंभ लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, सौ. दुर्गाताई तांबे आदींसह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, १९८५ च्या निवडणुकीने तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात केली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली. सततच्या विकास कामांमधून आज संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील असलेल्या तालुक्यांमध्ये आहे. येथील शिक्षण सहकार बंधूभावाचे वातावरण अत्यंत चांगले वातावरण आहे. हीच परंपरा तरुणांना पुढे न्यायची आहे.
निवडणुकीमुळे अनेक जण येतील. मने दूषित करण्याचा प्रयत्न करतील. परंतु अशांना वेळीच रोखा. युवा काँग्रेसच्या माध्यमातून युवा संवाद गावोगावी जाणार आहे. अनेक युवक जोडले जातील. युवक चळवळीतून कार्यकर्ते घडत असतात. शहाजीराजांनी याच ठिकाणाहून स्वराज्याची संकल्पना मांडली. सर्वधर्म समभाव जोपासणारा विचार आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं असल्याचे ते म्हणाले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सध्या संविधान धोक्यात आहे. चांगल्या भारतासाठी तरुणांनी एकत्र आले पाहिजे. स्वतःची क्षमता दाखवा. आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सभ्यतेची, प्रेमाची, बंधूभावाची संस्कृती निर्माण केली असून ती जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहा असे सांगितले.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, युवा संवाद यात्रा ही बारा दिवस चालणार असून तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्यां-वास्त्यांवरील तरुणांशी संवाद साधणार आहे. ही यात्रा स्वाभिमानासाठी असून संगमनेर तालुक्यात डोंगर, दऱ्या, नदी परिसर, पठार भाग, दुष्काळी पट्टा अशी भौगोलिक परिस्थिती आहे. या सर्व भागांचा अभ्यास तरुणांना करायचा आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील चांगल्या राजकारणाची संस्कृती आणि स्वाभिमान प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुण काम करणार असून खबर्यांचा बंदोबस्त ही युवा पिढीकडे करेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी देवीची आरती केल्यानंतर तिरंगा ध्वज आमदार बाळासाहेब थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याकडे घोषणांच्या निनादात सोपवण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील ५ हजार युवक व युवती यांसह पेमगिरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१३ दिवसात ५०० किलोमीटरचा प्रवास..
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्या - वास्त्यांवर जाऊन युवक काँग्रेसचे हजारो तरुण १२ दिवसांमध्ये ५०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यावेळी युवा संवाद यात्रेतील सर्व तरुण तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाबरोबर येथील समृद्ध परंपरा याबाबत विविध गावांमधील युवक, नागरिक व महिला या सर्वांच्या बरोबर ते संवाद साधणार आहेत.