देशाच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार - खासदार राहुल गांधी

संगमनेर Live
0
देशाच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार - खासदार राहुल गांधी

◻️ छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज नसते तर देशाचे संविधान नसते

◻️ राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

संगमनेर LIVE (कोल्हापूर) | छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर, त्यांच्या आचार विचारांचे पालन करावे लागते. शिवाजी महाराज हे ज्या कार्यासाठी लढले, जगले त्यातील थोडे तरी आपण आत्मसात केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महान कार्य केले व अन्यायाविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारच देशाच्या संविधानात आहेत, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज नसते तर हे संविधान नसते असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.

कोल्हापुरातील कसबा बावडा भागात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, देशात दोन विचारधारा आहेत, एक विचार धारा देश जोडणारी, सर्वांना सोबत घेऊन काम करणारी तर दुसरी विचारधारा संविधान संपवणारी आहे. ही विचारधारा लोकांना घाबरवते, या विचारधारेचे लोक शिवाजी महाराजांना नमस्कार करतात पण त्यांच्या विचारांचे पालन करत नाहीत. याच विचारधारेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही. त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला पण तो काही दिवसातच कोसळली. ही राजकीय लढाई नाही तर विचाराची लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या उचगाव येथे टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर महाराजांना अभिवादन केले.

खासदार शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते, तेंव्हापासूनच धर्मनिरपेक्षतेची सुरुवात झाली आहे.

विधान परिषदेतील गटनेते व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्पक आ. सतेज पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी या पुतळ्याच्या संकल्पनेची व रचनेची माहिती दिली. खा. राहुल गांधी यांच्या मनातील राज्य महाराष्ट्रात आणू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला व नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे संकल्पक विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील असून शिल्पकार सचिन घारगे, पाचगाव तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आहेत.

या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार शाहू महाराज, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, रजनी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, काझी निजामुद्दीन, बी. वी. व्यंकटेश, आ. भाई जगताप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, आमीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे  आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !