धांदरफळ सभेतील ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा संगमनेर तालुक्यात निषेध
◻️ गुन्हे दाखल करण्यासाठी संतप्त कॉग्रेस कार्यकर्त्याचे ठिय्या आंदोलन
◻️ खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे, सौ. प्रभावती घोगरेनी व्यक्त केला निषेध
◻️आरोपींना पकडण्यासाठी १२ पथके रवाना
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभेत स्थानिक पुढारी वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील कॉग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
घुलेवाडी येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वसंत देशमुख व डॉ. सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठिय्या आणि निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा आ. डॉ. सुधीर तांबे, राहता काँग्रेसच्या उमेदवार सौ. प्रभावती ताई घोगरे, हेमंत ओगले, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, सचिन गुजर, करण ससाने, सौ. दिपाली ससाने, राहुरीचे बाळासाहेब आढाव, बाबा ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, आरपीआय नेते बाळासाहेब गायकवाड, राजू खरात, सचिन चौगुले, अमर कतारी, अशोक सातपुते, संजय फड यांच्यासह संगमनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी युवक कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल धांदरफळ येथील सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली व शेकडो महिला व तरूण कार्यकर्त जमा झाले. या सर्वांनी घुलेवाडी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला व दोषींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली. परंतु पोलीस प्रशासनावर दबाव असल्याने रात्रभर हजारो लोक पोलीस स्टेशन समोर थांबूनही पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आंदोलन करत्यानी केला. त्यानंतर सकाळी चार गुन्हे दाखल करण्यात आले.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, थोरात परिवार हा सुसंस्कृत परिवार आहे. या परिवाराचा सर्व राज्य आदर करतो आहे. परंतु वाईट प्रवृत्ती काय असते ती आता संगमनेर ने नव्हे तर जिल्ह्याने अनुभवली आहे. महायुतीच्या उमेदवारांचा डिपॉझिट जप्त करून सर्वांनी निषेध करावा असे आवाहन केले.
सौ. प्रभावती ताई घोगरे म्हणाल्या की, ही वाईट संस्कृती राहाता तालुक्याला माहीत आहे. विरोधी बोलले कि, तंगड्या तोडल्या जातात. या सर्वांचा एकजुटीने बंदोबस्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सुसंस्कृत राजकारण ही आपली परंपरा आहे. मात्र कुणी अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर संगमनेर तालुका हे सहन करणार नाही. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र शिर्डी मतदारसंघातील दडपशाही आणि हुकूमशाही येथे चालणार नाही. संगमनेर चा नागरिक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे पुनरुच्चार केला.
यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, सचिन गुजर, हेमंत ओगले, उत्कर्ष रूपवते, सचिन दिघे, सचिन चौगुले, बाळासाहेब गायकवाड विश्वासराव मुर्तडक, सुरेश थोरात, निर्मलाताई गुंजाळ, सौ. उज्वला देशमाने, आदींसह विविध नागरिकांनी या घटनेचा निषेध केला.
यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेर येथे आंदोलकांशी चर्चा करुन आरोपींना पकडण्यासाठी १२ पथके नियुक्त केली असून आरोपीवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.