◻️ जिल्ह्यातील पात्र महिलांना गुलाबी ई - रिक्षाचा लाभ द्या - जिल्हाधिकारी
संगमनेर LIVE (अहमदनगर) | समाजातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने शासनाने पिंक (गुलाबी) ई - रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू व पात्र महिलांना पिंक (गुलाबी) ई - रिक्षाचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक (गुलाबी) ई - रिक्षा योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गर्जे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, महिलांना, मुलींना रोजगार निर्मितीस चालना देऊन, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना आत्मनिर्भर करणे, तसेच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय २० ते ४० वर्षादरम्यान असावे. ई - रिक्षा खरेदीसाठी ७० टक्के रक्कम बँकेद्वारे कर्जस्वरुपात दिली जाणार असुन २० टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येणार आहे तर १० टक्के रक्कम लाभार्थ्याने भरावयाची असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कराळे यांनी यावेळी दिली.