क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुलेंमुळे समतेची शिकवण - डॉ. सुधीर तांबे
◻️ महात्मा फुलेंना स्मृतिदिनानिमित्त माळीवाडा व यशोधन कार्यालयात अभिवादन
संगमनेर LIVE | थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समतेसाठी लढा दिला. त्यांचे जिवनकार्य हे सर्व भारतीयांना सदैव प्रेरणादायी आहे. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करुन पुरोगामी विचार देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे देशाला समतेची शिकवण मिळाली असल्याचे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा व यशोधन कार्यालय येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समवेत माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, धनंजय डाके यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. तांबे म्हणाले कि, महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक मानले जात असून समानता व स्त्री शिक्षणासाठी त्यांनी खुप मोठे कार्य केले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे महत्वाचे साधन असून शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी तत्कालीन जुन्या परंपरा मोडीत काढून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देवून पहिल्या स्त्री शिक्षीका बनविले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून ब्रिटीशांपुढे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांनी समतेचा पुरोगामी विचार देशाला दिला.
अंधश्रध्दा निर्मुलन, सतीची चालबंदी, केशवपण यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक विषमता नष्ट करुन समाजात समता निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले असून प्रतिगामी शक्तींचे विचार मोडून काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समतेचे पुरोगामी विचार तरुणांनी आचारणात आणले पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, आजच्या स्त्री शिक्षणात व समाजाच्या प्रगती महात्मा फुले यांचे मोठे योगदान असून समाजातील अनिष्ठ चाली रिती, रुढी व परंपरा बंद करण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे खुप मोठे कार्य केले असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान यशोधन कार्यालय येथे झालेल्या अभिवादन प्रसंगी प्रा. बाबा खरात यांनी महात्मा फुले यांना अभिवादन करणारी गीते गायली.