उच्चस्तरीय कालव्यामार्फत निळवंडेचे आवर्तन सोडा
◻️ किसान सभेचे अजित नवले आणि सहकाऱ्यांची मागणी
संगमनेर LIVE | अकोले तालुक्यातील डोंगरालगतच्या गावाला पिकांसाठी पाण्याची टंचाई भासू लागली असून उच्चस्तरीय कालव्यांमधून निळवंडेचे उच्चस्तरीय आवर्तन सोडून पिकांना पाणी द्या अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. किसान सभेच्या वतीने या मागणीसाठी प्रशासनास संपर्क करण्यात आला असून प्रशासनाने उच्चस्तरीय कालव्यांमार्फत तातडीने पाणी सोडावे अशी मागणी किसान सभेने केली आहे.
भंडारदरा व निळवंडे यांच्या संयुक्त जलव्यवस्थापनातून अकोले तालुक्यातील डोंगराकडच्या भागांना पाणी देण्यासाठी उच्चस्तरीय कालव्यांची निर्मिती मोठ्या संघर्षातून झाली आहे. दोन्ही धरणांच्या संयुक्त जलव्यवस्थापनातून निळवंडे भिंती लगत अधिकाधिक पाणी पातळी ठेवून मार्च अखेरपर्यंत परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तनाने पाणी देणे अपेक्षित आहे. पाणी पातळी खाली गेल्यानंतर असे पाणी देणे भौगोलिक दृष्ट्या अशक्य होणार असल्यामुळे पाणी पातळी असतानाच हे पाणी देणे आवश्यक आहे.
वंचित शेतकऱ्यांना पाणी देता यावे यासाठी निळवंडेचे पाणी उचलून भिंती जवळील उंचीवर बांधण्यात आलेल्या टाकीत सोडून अधिक काळापर्यंत शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबतची योजनाही पूर्णत्वाकडे केली आहे. या योजनेची तातडीने ट्रायल घेऊन याचाही लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.
उच्चस्तरीय कालव्यांचे काम जुने झाले असून अनेक ठिकाणी वॉल खराब आहेत. पाणी सोडण्याच्या यंत्रणेचीही संपूर्ण सर्विसिंग करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने आर्थिक नियोजन करून उच्चस्तरीय कालव्याची संपूर्ण देखरेख करावी अशी मागणी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, प्रकाश साबळे, राजू गंभिरे, एकनाथ गीऱ्हे यांनी केली आहे.