शासनाने दूध अनुदानाबाबत त्वरीत निर्णय घ्यावा - रणजितसिंह देशमुख
◻️ राजहंसकडून नवीन वर्षाची सुरूवात दूध खरेदीत १ रुपये दरवाढ निर्णयाने
संगमनेर LIVE | राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. माहे जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शासनाने प्रती लिटर ५ रूपये अनुदान देण्याची योजना राबविली. तर आक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यासाठी ७ रूपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
माहे सप्टेंबर २०२४ पर्यंत दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. मात्र माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांचे अनुदान दूध उत्पादकांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने दूध उत्पादकांना प्रति लिटर ७ रुपये अनुदान देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी व माहे डिसेंबरपासून पुढील कालावधीकरिता ही अनुदान योजना चालु ठेवावी, अशी मागणी संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह
देशमुख यांनी केली आहे.
ही मागणी करताना रणजीत सिंह देशमुख पुढे म्हणाले की, दुग्धव्यवसाय सद्यस्थितीत अडचणीत असुन शासनाने दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. डिसेंबर महिना संपला तरी डिसेंबर महिन्याचे अनुदान देणेबाबतचा ठोस असा निर्णय शासनाने अद्यापपर्यंत घेतलेला नाही. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
शासनाने अनुदान निर्णयाबाबत विलंब न लावता तात्काळ निर्णय घेण्याचे अवाहनही रणजीत सिंह देशमुख यांनी केले. सद्यस्थितीत दूध भुकटी व बटरचे दर स्थिर आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दुधाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच चाऱ्याचे व पशुखाद्याचे दर वाढलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक डॉ. खिलारी आदींसह सर्व मान्यवर उपस्थित होते.
राजहंस दूध संघाकडून नवीन वर्षात १ रुपये प्रति लिटर दूध दरवाढ
संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कायम तालुक्यातील शेतकरी व दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने नवीन वर्षात प्रती लिटर १ रूपये दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षांची सुरूवात संगमनेर तालुक्यातील दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने आनंद देणारी असल्याची माहितीही चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.