डॉ. विखे पाटील फौंडेशनच्या विद्यार्थ्यानी पथनाट्यातून केली एड्सबद्दल जनजागृती
◻️ जिल्हा रुग्णालय येथे जनजागृती रॅलीचे आयोजन
संगमनेर LIVE (नगर) | एड्स संबंधित समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. हा एक साथीचा रोग असून एका व्यक्तीद्वारे दुसऱ्यांना होवू शकतो. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी जनजागृती होणे काळाची गरज आहे. यावर्षी, जागतिक एड्स दिनाची “अधिकाराचा मार्ग घ्या: माझे आरोग्य, माझा हक्क!" ही थीम असून या निमित्ताने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथील सामाजिक आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थांनी एड्सचा प्रतिबंध कसा करावा याचे पथनाट्याद्वारे सादरीकरण केले. तसेच ज्ञानसरिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एड्सबद्दल पथनाट्याद्वारे व पोस्टर्सच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
ह्युमन इम्युनो डेफिशियन्शी व्हायरसमुळे हा रोग होत असून एड्स बाधित लोकांसाठी समाजात चांगलं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने सदरील दिवस साजरा करतात. सन १९८८ साली पहिल्यांदा जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेने २०२४ च्या जागतिक एड्स दिनासाठी एक विशेष थीम जाहीर केली आहे. २०३० पर्यंत एड्स समाप्त करण्याचे "शाश्वत विकास लक्ष्य" साध्य करण्यासाठी मानवी हक्क कसे महत्त्वाचे ठरू शकतात हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
तसेच या आजारावर आजपर्यंत कोणताही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही. एचआयव्ही संसर्गावर उपचार करू शकणारे औषध जगाला अद्याप सापडलेले नाही. हा आजार असाध्य राहतो, पण खबरदारी हाच आता प्रतिबंध करण्याचा एकमेव मार्ग आहे. एड्स (ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) हा अत्यंत संसर्गजन्य आहे. कारण एचआयव्ही काही शारीरिक द्रव्यांच्या देवाणघेवाणीद्वारे प्रसारित केला जाऊ शकतो. म्हणूनच एड्सच्या रुग्णासोबत सुया, सिरिंज आणि इंजेक्शनचे इतर सामान शेअर केल्याने संसर्ग होऊ शकतो.
“अधिकार-आधारित दृष्टीकोन हे केवळ एक धोरण नाही; प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, आरोग्य आणि स्वायत्तता टिकवून ठेवण्याची ही वचनबद्धता आहे, विशेषत: ज्यांना असुरक्षितता आहे आणि ज्यांना सर्वाधिक धोका आहे. प्रतिबंध, उपचार आणि काळजी यामध्ये प्रवेश करण्यामध्ये गंभीर अडथळे म्हणून उभे असलेल्या कलंक आणि भेदभावाचा आपण धैर्याने सामना केला पाहिजे," असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले असून ही माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली.
डॉ. विक्रम पानसंबळ (वैद्यकीय अधिकारी, ए. आर. टी, सेंटर), अहिल्यानगर यांनी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सरकारचे ध्येय धोरण आणि नवीन तपासणी व उपचार याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. डी. एनधामणे, वैद्यकिय अधिकारी, विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे ए. आर. टी. विभागाचे विभागप्रमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. रामचंद्र पडोळकर तसेच नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर आणि डॉ. योगिता औताडे (उपप्राचार्य व विभाग प्रमुख) यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी सागर विटकर (पर्यवेक्षक) अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, अहिल्यानगर, अमोल अनाप, राहुल कडू, विशाल पुलाटे, प्रीती कडू, श्वेता भिंगारदिवे यांचे विशेष सहकार्य लाभले.