सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्काराची घोषणा
◻️ खा. शाहू छत्रपती महाराज व विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थिती पुरस्कार वितरण
◻️ डॉ. रावसाहेब कसबे, माजी मंत्री राजेश टोपे व वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा होणार गौरव
संगमनेर LIVE | कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट यांना तर स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला आहे. तसेच सहकारातील आदर्श नेतृत्व हा पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांना दिला जाणार आहे.
१२ जानेवारी २०२५ रोजी दु. १२.३० वा. यशोधन कार्यालयाजवळील मैदान येथे होणाऱ्या कार्यक्रमात कोल्हापूरचे खासदार आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली.
जयंती महोत्सवा बाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे व डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी जयंती महोत्सवातील शानदार कार्यक्रमाने या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
यावर्षी कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल असणारा डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांना जाहीर झाला आहे. तर साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, माध्यम आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला आहे.
याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर झाला आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी प्रा. अशोक सोनवणे यांनी डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जीवन कार्यावर लिहिलेले कृषिरत्न पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान हे राज्यस्तरीय पुरस्कार विजय अण्णा बोराडे, डॉ. राजीव शिंदे, उल्हास लाटकर, उत्कर्षा रूपवते, प्राचार्य केशवराव जाधव व प्रा. बाबा खरात यांच्या पुरस्कार निवड समितीने जाहीर केले आहे.