अहिल्यानगर येथे सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी प्रयत्न करू - प्रा. राम शिंदे

संगमनेर Live
0
अहिल्यानगर येथे सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी प्रयत्न करू - प्रा. राम शिंदे

◻️ १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचा समारोप

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल आणि  संबधित विभागाचे मंत्री, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली.

१०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला संमलेनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी, नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, प्रा. प्रसाद बेडेकर, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

दूरचित्रवाणी आणि भ्रमणध्वनीच्या मोहजालात नवी पिढी अडकत असतांना तीन दिवस त्यांना उत्तम कलाविष्कारामध्ये गुंतवून ठेवण्याची किमया या नाट्य संमेलनाने केल्याचे नमूद करून प्रा. शिंदे म्हणाले, १०० व्या नाट्य संमेलनाचा मान सर्व विभागांना देवून प्रादेशिक संमेलन भरविण्याची कल्पना कौतुकास्पद आहे. 

मराठी रंगभूमी कलाकरांना प्रोत्साहन देण्यासाठी अहिल्यानगरचे नाट्यगृह लवकर उभे करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल. नाटक रंगमंचावर सादर करणे हा जसा कलेचा अविष्कार आहे, तसेच कलेचा आस्वाद प्रेक्षागृहात सर्वांनी सामुहिकपणे घेणे हे कलेचे सार्थक आहे. समाजात ही बाब रुजविणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा विकास जरी झाला तरी मानवी सृजनशीलतेला ती पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे नाट्यरसिकांचा प्रतिसाद नाट्यसृष्टीला उभारी देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, नाटकांमधून विविध रसांनी युक्त लोकव्यवहार दिसतात. नाटकात विविध प्रकारच्या प्रेक्षकांना उपयुक्त ठरणारे विचार असतात. नाटक विरंगुळा देण्यासोबत बोधप्रदही असते. मराठी रंगभूमीला वैभवशाली वैभवशाली परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करण्यात मराठी नाटकाचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नांची मांडणी मराठी रंगभूमीने केली, असेही प्रा. शिंदे म्हणाले.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, अहिल्यानगरसारख्या शहरात सगळ्या कलांना वाव मिळेल यासाठी सांस्कृतिक संकुलाची आवश्यकता आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी, लहान नाटकासाठी, नाटक आणि नृत्याच्या तालमीसाठी, ग्रामीण भागातील लघुचित्रपट निर्मिती करणाऱ्या नवतरुणांसाठी सभागृहाची व्यवस्था यात असावी. विविध कलांची दालने असावी. त्यातुन लहान गावापर्यंत ही कलेची चळवळ पोहोचू शकेल. विविध विकास कामांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांस्कृतिक वारशाची जपणूकही करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

अत्यंत कमी वेळामध्ये उत्साहवर्धक वातावरणात नाट्यसंमेलनाचे आयोजनाबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यकलेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दर्जेदार व सर्व सुविधांनी युक्त नाट्यगृहाची उभारणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान डॉ. कांडेकर, हांडे यांनी यावेळी विचार व्यक्त केले. विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविकात विभागीय नाट्यसंमेलनाविषयी माहिती दिली.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !