शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विद्यापीठाने कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा - राज्यपाल

संगमनेर Live
0
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विद्यापीठाने कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा – राज्यपाल 

◻️ ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी दिल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले आभार

◻️ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २६ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

संगमनेर LIVE (परभणी) | हरितक्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने दिमाखात परभणीत उभ्या असलेल्या मराठवाड्यातील कृषी विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती  सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात आयोजित मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रति कुलपती ॲड. माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर, कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. (डॉ.) इंद्र मणि, आमदार व कार्यकारी परिषद सदस्य डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, कृषि अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी यांच्यासह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना राज्यपालांनी डॉक्टरेट ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्याबाबत विनंती करण्यात आली.  दरम्यान, कार्यक्रमास उपस्थित विखे पाटील यांना राज्यपाल यांच्या हस्ते डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल म्हणाले की, जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गाच्या लहरीपणाने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेत येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल, अशा प्रकारच्या बि - बियाण्यांवर संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा विद्यापीठाने भाग बनावे. कृषि संशोधन आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या विकासाला विद्यापिठातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्राधान्य द्यावे.

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात आहे. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सद्यस्थितीत देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे. भारतीय स्वातंत्र्यावेळी 50 दशलक्ष टन कृषि उत्पन्नात वाढ होऊन आता ती ३३२ दशलक्ष टनापर्यंत पोहचली आहे. देशाने आजपर्यंत हरित (अन्नधान्य), धवल (दूध), नील (मत्स्य), पिवळी (तेलबिया), गुलाबी (कांदा), सुवर्ण (फळे) आणि करडी (रासायनिक) क्रांती म्हणजेच सप्तक्रांति घडवून आणली असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

महाराष्ट्र हा कृषि क्षेत्रात नेहमीच देशामध्ये अग्रस्थानी राहिला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने पर्जन्यमानावर आधारित विविध पिकांमध्ये नवनवे संशोधन केले आहे. येथे ऊस, कापूस, सोयाबीन, संकरित आणि संशोधित वाण आहे. लहरी निसर्ग, पाण्याची चणचण असतानाही डाळी, तेलबिया, कापूस यातून ग्रामीण अर्थकारणाला मिळत असलेली चालना आणि त्यातून होत असलेली प्रगती आदिंचा उल्लेख करून कृषिक्षेत्रातील मूल्यसाखळी मजबूत करण्यात येथील शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. राज्याने नुकताच दिल्लीत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय  कार्य केल्याबद्दल २०२४ चा अँग्रीकल्चरल टूडे ग्रूप, दिल्लीचा पुरस्कार पटकावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवस्थापन आणि ग्रामीण बदल (स्मार्ट) प्रकल्पातून विकास साधण्यावर भर दिला आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरासुद्धा याकामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. डिजीटल तंत्रज्ञानात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला असल्याचे सांगताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी ड्रोन, रोबोट आदि नवतंत्रज्ञानामुळे कृषि क्षेत्रात शेतक-यांच्या कौशल्यात वृद्धी होत असल्याचे सांगितले. विद्यापीठाला कृषि पदवीधर, शेतकरी आणि ग्रामीण भागातील युवा वर्गाची सांगड घालण्यात यश मिळत असून ग्रामीण युवकांना रिमोट पायलट आणि पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सेंटरसोबत ड्रोन उद्योगाशी समन्वय साधून देण्याचे काम विद्यापीठ करत असल्याचे त्यांनी सांगितले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे पदवी, पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेट अशा पदवी देणारे १६ कॉलेज आणि ४३ अफिलेट कॉलेज सात शाखांच्या माध्यमातून शिक्षण देत आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी २०२० च्या नव्या शिक्षण धोरणानुसार शिक्षण आणि त्याची योग्य अंमलबजावणी, संशोधन आणि विकासातील सहभाग, विस्तारित शिक्षणातील शेतकरी देवो भव, कृषि क्षेत्रातील कौशल्य विकासात विद्यापीठाचा पुढाकार, कृषि जमीन विकास आणि संशोधित बीज उत्पादन, या विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीसाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय  हरित विद्यापीठ (इंटरनॅशनल ग्रीन युनिर्व्हसिटी) हे पारितोषिक मिळविले असल्याचा आनंद होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठाने नवी ओळख निर्माण केली असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संबोधनात सांगितले. दीक्षात समारंभात सर्व पदवीधारकांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी  दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले विद्यापीठाचे आभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली डॉक्टरेट ही पदवी मी नम्रपणे स्वीकारत असल्याचे सांगून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची गणना होते. हरितक्रांतिचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कृषी विद्यापीठाने ही पदवी दिल्यामुळे त्याचे वेगळेच महत्त्व असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले.

सध्या जागतिक तापमानवाढ, बदलता आणि लहरी निसर्ग  ही नवी आव्हाने शेतीपुढे आहेत. शेतक-यांचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठाने वाणांमध्ये नवनवीन संशोधन करून शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश आवश्यक - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने अनेक पिकांमध्ये संशोधन केले आहे, ही आनंदाची बाब असून कृषी उत्पादन वाढीत विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सोयाबीन, तूर पिकांमध्ये नवतंत्रज्ञानातून क्रांति घडविण्यात आली आहे. विद्यापीठ करीत असलेले संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणेही  गरजेचे आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षणात बदल करताना कृषि हा विषय त्यामध्ये नव्याने समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकांवर अधिक भर द्यावा. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दोन-तीन एकर शेती देऊन प्रात्यक्षिकाकडे वळविण्याची गरज कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी व्यक्त केली. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निश्चितपणे चांगले निर्णय घेतले जातील, असे सांगून शेतकऱ्यांनी  सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहनही  श्री. कोकाटे यांनी केले.

यावेळी कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी प्रास्ताविक केले तर कृषि अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी यांचेही समयोचित भाषण झाले.

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, माजी कुलगुरु तथा कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. व्यंकटराव मायंदे, कार्यकारी परिषद सदस्य प्रवीण देशमुख, डॉ. दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, डॉ. आदिती सारडा, सुरज जगताप, आणि विठ्ठल सकपाळ, कुलसचिव संतोष वेणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दयानंद मोरे, प्रा. विणा भालेराव यांनी केले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यापिठाकडून २९ जणांना पीएचडी प्रदान ; सुवर्ण पदकाचे २० मानकरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचा आज दीक्षान्त समारंभ कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्णजयंती दीक्षांत सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यापिठातील विविध विषयात २९ जणांना विद्यावाच्यस्पती पदवी प्रदान करण्यात आली तर विविध शाखांचे २० विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.

अशोका के. एस., एस. एम. कविभारथी, बोडखे गणेश महादेव, पल्लवी लालासाहेब कोळेकर, लिओना गुरुल्ला, सचिन लक्ष्मण धारे, श्रीराम तुकाराम शिंदे, शेंडे संतोष सुभाष, कौसडीकर किशोर दत्तराव, बन्ने श्रीधर श्रीनिवास, चौधरी सुवर्णा दत्तराव, कदम सृष्टी संभाजीराव, उगले महेश विलास, सत्वधर प्रिया प्रभाकर, गावडे राजू नामदेव, देशमुख कल्याणी दिलीपराव, पाचखंडे ज्ञानेश्वरी नारायण, चव्हाण कोमल अंकुश, चव्हाण किशोर मल्हारी, सावंत ध्रुवराज नरसिंगराव, राठोड अर्चना श्रीराम, वायकुळे प्रिती कोंडीबा, होळमुखे संगिता सुरेश, भालेराव ज्योत्स्ना भीमराव, गिरडेकर शुभम भानुदास, साटले भिमाशंकर, ठाकूर निरंजन रविंद्र, सरगर प्रमोद रामचंद्र आणि ए. पोशद्री यांनी विविध विषयांमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे.

मयुरी संतोष गुंड, प्रिती बाबासाहेब भोसले, आकाश मुंजाभाऊ माने, आरती गुलाबराव सुर्यवंशी, प्रिती कोंडीबा वायकुळे, श्वेता गणपती भट, पिता सिरीशा, कैरी प्रतीक्षा पॅट्रो, अन्सारी गौसुद्दिन मोहम्मद नुरोद्दिन, शुभम राजकुमार सुर्वे, शिवानी हनुमंत थोरात, जयेश राजेंद्र बोबडे, सिमी देवकांत शुक्ला, श्रावणी चित्रसेन लोमटे, श्वेता वसंतराव निलवर्ण, ऋतुजा विजयकुमार तापडिया, तेजश्री पंढरीनाथ अनारसे, जी. गोपिका अनिलकुमार, श्रुती अनिल गरड आणि बी. साई चंदना यांचा सुवर्ण पदकाच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे.

सत्वधर प्रिया प्रभाकर, बोबडे जयेश राजेंद्र, साक्षी विजय कटाईत, राजपाल संजय कुटुंभरे, मोहिनी भिमराव खरवडे यांनी विविध संस्थांकडून जाहीर केलेली रोख रकमेची पारितोषिके पटकावली आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !